• Mon. Nov 25th, 2024

    सरासरी पावसाचा विषम वर्षाव; पिकं करपत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, या जिल्ह्यांनी चिंता वाढवली

    सरासरी पावसाचा विषम वर्षाव; पिकं करपत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, या जिल्ह्यांनी चिंता वाढवली

    छत्रपती संभाजीनगर : ऑगस्टमध्ये राज्यात फारसा दिलासादायक पाऊस नसल्याने भारतीय हवामान विभागाने उपाययोजनेसंदर्भात सूचना केली होती. राज्यात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाल्याचे राज्य सरकारतर्फे शुक्रवारी सांगण्यात आले. मात्र सरासरीच्या या आकडेवारीवरून काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच, मराठवाड्याच्या काही भागांत पिके करपायला लागल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे राज्यातील सरासरी पावसाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता जिल्ह्यांमधील शेतीच्या प्रत्यक्ष परिस्थितीकडे पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    विदर्भामध्ये धानाची पहिली रोवणी झाली, मात्र पुरेसा पाऊस नसल्याने निंदण म्हणजे शेतीतील कचरा काढता येत नसल्याची माहिती भंडारा जिल्ह्यातील माणेगाव बाजार येथील तरुण शेतकरी ओंकेश बावनकुळे यांनी दिली. शेतामध्ये भेगा पडल्या आहेत. आत्ताच्या पिकाला खत देण्याचीही गरज आहे. मात्र पाणी नसल्याने खतही देता येत नाही. तसेच आठ दिवसांपूर्वी रोवणी झालेली रोपे पाणी नसल्याने करपायला लागलेली आहेत, असेही ते म्हणाले.

    मराठवाड्यातील परिस्थिती अधिक बिकट आहे. आठही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेरणी झालेली नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे पाण्याची टंचाई नव्हती. मात्र यंदा मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु धरणप्रकल्पांमध्ये केवळ ३५ टक्के पाणी आहे. ६०० धरणे पूर्ण कोरडी आहेत. यावरून पाण्याची स्थिती लक्षात यावी असे तेथील शेतकरी म्हणत आहेत. बीड, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना या चारही जिल्ह्यांमध्ये पिकांची वाढ नाही. तूर, सोयाबीन, मका ही पिके घेता येतील एवढा पाऊस नाही याकडेही लक्ष वेधले जात आहे. आठ ते नऊ जिल्ह्यांमध्ये पिके मरणावस्थेत अन्नादाता शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी असल्याचे सांगितले. आता पाऊस पडला तरी धान्य पिकणार नाही, उत्पादन होणार नाही अशी शक्यता त्यांनी वर्तवली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरिपातील पिके हातातून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सगळ्या जिल्ह्यांमधील आकडेवारीचा अभ्यास करून ती माहिती जाहीर केली पाहिजे. ढोबळमानाने दिलेली आकडेवारी हे संपूर्ण राज्याचे चित्र दाखवत नाही. या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. सोयाबीनचे पीक ९० दिवसांमध्ये तयार होते. मात्र जूनमध्ये पेरणी झाल्यावर आता ७५ दिवस उलटले असून हे सोयाबीन जळून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

    देशातील ४० टक्के तूर मराठवाड्यात पिकतो. त्यालाही मोठा धक्का पोहोचला आहे. राज्य सरकारने राज्यातील धरण क्षमता वाढवण्यासाठी गाळ काढण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. मात्र धरणांमधील गाळही काढला जात नाही. येत्या काळात पाऊस न पडल्यास मराठवाड्यात भीषण दुष्काळ येईल. त्यामुळे जमिनीवरील परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    शेतकरी हवालदिल; शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाने दडी मारल्याने धानाचे पीक धोक्यात
    पावसाच्या मोठ्या तुटीचे जिल्हे

    मध्य महाराष्ट्र- अहमदनगर, धुळे, सांगली, सातारा
    मराठवाडा- छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, परभणी
    विदर्भ- अकोला, अमरावती, बुलढाणा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed