एडीआर संस्थेच्यावतीने २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील आमदारांच्या संपत्तीचा अभ्यास करण्यात आला. आमदारांनी निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यासासाठी आधार घेण्यात आला. अहवालातील माहितीनुसार, देशात कर्नाटक राज्यातील २२३ आमदारांकडे १४ हजार ३५९ कोटींची संपत्ती आहे. यानंतर महाराष्ट्रातील २८४ आमदारांकडे ६ हजार ६७९ कोटींची संपत्ती आहे. कर्नाटकच्या अभ्यासासाठी २०२३मधील विधानसभा निवडणुकीचा तर महाराष्ट्रासाठी २०१९च्या राज्य निवडणुकीचा आधार घेतला गेला. यामुळे महाराष्ट्रातील आमदारांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली असल्याची शक्यता आहे. आमदाराच्या सरासरी संपत्तीकडे बघितले तर महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराकडे सरासरी २३ कोटी ५१ लाखांची संपत्ती आहे. अहवालातील माहितीनुसार, ९० कोटी संपत्तीसह त्रिपुरा राज्यातील ५९ आमदार सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत.
भाजपकडे १६ हजार कोटी, कॉँग्रेसकडे १५ हजार कोटी
एडीआरच्या अहवालात पक्षानुसार संपत्तीचीही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. यानुसार, भाजपच्या १,३५६ आमदारांकडे १६ हजार २३४ कोटींची संपत्ती आहे. कॉँग्रेसच्या ७१९ आमदारांकडे १५ हजार ७९८ कोटींची संपत्ती आहे. पक्षनिहाय टॉप-१० पक्षांच्या यादीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचाही समावेश आहे. राष्ट्रवादीच्या ६३ आमदारांकडे ९१२ कोटी असून यादीत नवव्या क्रमांकावर हा पक्ष आहे.
मालदारांचे राज्य
राज्य – आमदार – एकूण संपत्ती
कर्नाटक – २२३ – १४ हजार ३५९ कोटी
महाराष्ट्र – २८४ – ६ हजार ६७९ कोटी
आंध्र प्रदेश – १७४ – ४ हजार ९१४ कोटी
उत्तर प्रदेश – ४०३ – ३ हजार २५५ कोटी
गुजरात – १८२- २ हजार ९८७ कोटी
प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे इतके…
कर्नाटक – ६४ कोटी ३९ लाख
आंध्र प्रदेश – २८ कोटी २४ लाख
महाराष्ट्र – २३ कोटी ५१ लाख
गुजरात – १६ कोटी ४१ लाख
उत्तर प्रदेश – ८ कोटी ७ लाख