एमएमआरडीएकडून महामुंबई क्षेत्रात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे. त्यामध्ये रस्ते, पूल उभारणीसह मेट्रो रेल्वे उभारणीच्या कामांचा समावेश आहे. त्यापैकी १९.५४ किमीची मोनोरेल सन २०१४मध्ये सुरू झाली. तर अंधेरी पश्चिम ते गुंदवलीमार्गे दहिसर ही मेट्रो २ अ व मेट्रो ७ ही संयुक्त मार्गिका एप्रिल, २०२२ आणि जानेवारी, २०२३मध्ये दोन टप्प्यांत सुरू झाली. मोनो रेलसाठी जवळपास २४६० कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर कार्यान्वित झालेल्या दोन मेट्रोसाठी जवळपास १२ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, या तिन्ही मार्गिका आज भीषण तोट्यात आहेत.
सर्वाधिक तोट्यात मोनो रेल आहे. मोनो रेलला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३१ मार्च, २०२३ अखेरीस तब्बल २४२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या संपूर्ण वर्षात प्रकल्पाला फक्त १३.४१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर यानंतर आता मार्गिकेसाठी ५८० कोटी रुपयांच्या नवीन गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव आहे. ही खरेदी भांडवली खर्चातील असेल. भांडवली खर्च ग्राह्य धरल्यास कंपनीचा हा तोटा ५२० कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. दरमहा हा तोटा ४४ कोटी रुपयांपर्यंत असेल. दुसरीकडे मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिकांचा ३१ मार्च, २०२३चा (वर्ष २०२२-२३) तोटा २८१ कोटी रुपये होता. आता चालू आर्थिक वर्षात या मार्गिकांचा मासिक खर्च हा ४२ कोटी रुपये अंदाजित आहे. त्या तुलनेत मिळणारा मासिक महसूल मात्र फक्त १९ कोटी रुपये असेल. यामुळे दरमहा किमान २३ कोटी रुपयांचा तोटा या मार्गिकांना होणार आहे.
नवीन महसुली मॉडेल
मोनो, मेट्रो मार्गिकांना असलेला तोटा भरून काढण्यासाठी नवीन महसुली मॉडेलसाठी एमएमआरडीएने काम सुरू केले आहे. अशाप्रकारे मार्गिका तोट्यात असल्यास तो दूर करण्यासाठी काय-काय उपाययोजना करायला हव्यात, यावर एमएमआरडीएकडून अभ्यास सुरू आहे. त्यानुसार या मार्गिकांसाठी पुढील दोन ते तीन महिन्यांत नवीन महसुली मॉडेल निश्चित केले जाईल, अशी माहिती एमएमआरडीएतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
नवीन भांडवली गुंतवणुकीला स्थगिती
मोनो रेल भीषण तोट्यात असल्याने दहा नवीन गाड्यांच्या खरेदीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या भांडवली खर्चामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात मोनो रेलचा तोटा दुप्पट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.