म. टा. वृत्तसेवा, वर्धा : पुलगाव केंद्रीय दारूगोळा भंडारच्या ‘डिमॉलिश सेंटर’मध्ये मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट होऊन एका गावकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
काय घडलं?
काय घडलं?
योगेश किशोर नेरकर रा. सोनेगाव (आबाजी) असे मृताचे नाव आहे. सोनेगावजवळील केंद्रीय दारूगोळा भंडारचे हे डिमॉलिश सेंटर प्रतिबंधित क्षेत्र आहे. पण, या परिसरात प्रवेश करून योगेश झाडाखाली उभे होते. याच सुमारास बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरू होती. यातील एका बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर लोखंडी तुकडा योगेश यांच्या पोटात शिरून मृत्यू झाला. घटनास्थळी सुमारे २५ जण हजर असले तरी कुणालाही दुखापत झाली नाही. याविषयीची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यापूर्वी २० नोव्हेंबर २०१८ रोजी याच ठिकाणी कालबाह्य दारूगोळा निकामी करताना स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता. जवळपास दहा मजूर जखमी झाले होते. आता दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे.