• Sat. Sep 21st, 2024

शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार; राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोल्हापुरात होणार जाहीर सभा

शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार; राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोल्हापुरात होणार जाहीर सभा

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे २५ आणि २६ ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकात त्यांची जाहीर सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे तसेच बाईक रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष आर के पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची मुहुर्तमेढ रोवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. काहीही झाले तरी ‘शरद पवार एके शरद पवार’ असा नारा दिलेले आमदार हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने शरद पवार गटाला याचा मोठा धक्का बसला. मात्र शरद पवार यांनी पुन्हा पक्ष बांधण्यासाठी सज्ज झाले असून ते विविध जिल्ह्यात जाऊन सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांची दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे याबाबतची माहिती शहराध्यक्ष आर के पवार यांनी दिली असून २५ तारखेला साताऱ्यातून ते कोल्हापूर मध्ये दुपारी अडीच वाजता येणार आहेत. तेथून ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला देखील वंदन करणार असून यानंतर संध्याकाळी पाच वाजता दसरा चौकात त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

पक्ष फुटी नंतर शरद पवार हे पहिल्यांदाच कोल्हापुरात येत असल्याने शरद पवार गटाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत असून शरद पवार हे कोल्हापुरात दाखल होताच तावडे हॉटेल ते दसरा चौक त्यांची बाईक रॅली काढण्यात येणार आहे. यादरम्यान तावडे हॉटेल येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीची सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी २६ ऑगस्टला सकाळी कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून ते पुढे मार्गस्थ होणार आहेत अशी माहिती शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी दिली आहे. दरम्यान संध्याकाळी पाच वाजता त्यांची सभा पार पडणार असून या सभेत अजितदादांसोबत केलेल्या मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याबाबत काय बोलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची मुहुर्तमेढ रोवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. एकेकाळी शरद पवार यांना २ खासदार आणि ५ आमदार दिलेल्या या कोल्हापुरातील दोन्ही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याने शरद पवार कोल्हापुरात एकटे पडले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी जी चाचपणी केली होती, त्याचे कोल्हापूर हे महत्त्वाचे केंद्र होते.या पक्षाची स्थापनेची महत्त्वाची बैठकच कोल्हापुरात खानविलकर यांच्या घरात झाली आणि राष्ट्रवादीची मुहुर्तमेढ याच जिल्ह्यात रोवली गेली. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा गड मानला गेला.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि पाच आमदार राष्ट्रवादीचे होते. याशिवाय जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि महापालिकेच्या सत्तेतही राष्ट्रवादी कायम होती. दिवंगत नेते खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार निवेदिता माने, के. पी. पाटील, बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील, दिग्विजय खानविलकर अशी नेतृत्वाची भक्कम फळी या पक्षात होती. पवार यांच्या पुणे जिल्ह्यात जेवढे राष्ट्रवादीचे बळ नव्हते तेवढी ताकद कोल्हापूरने दिली होती. मात्र कालांतराने त्यांचा हा गड हातातून निसटला कारण होते पक्षात झालेली गटबाजी. गटबाजी मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यामधील आणि या वादात पवार यांनी मुश्रीफ यांना बळ देत त्यांच्यामागे उभे राहिले. मात्र हसन मुश्रीफ यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित दादा सोबत गेल्याने कोल्हापुरात शरद पवार यांना आपली पकड मजबूत करता येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed