• Sat. Sep 21st, 2024

एक दिवस तुमचा तर उरलेले ३६४ दिवस आमचेच, पंगा घेऊ नका; पोलीस अधीक्षकांनी दिला सज्जड दम

एक दिवस तुमचा तर उरलेले ३६४ दिवस आमचेच, पंगा घेऊ नका; पोलीस अधीक्षकांनी दिला सज्जड दम

कोल्हापूर: कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि साऊंड सिस्टीम मालकांची यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व साऊंड ऑपरेटर चालक मालक यांना चांगलाच दम भरला असून कायदा सर्वांना सारखाच आहे. त्याचं पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे म्हणत एक दिवस तुमचा तर उरलेले ३६४ दिवस आमचेच आहेत असे म्हणत कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्ज इशारा त्यांनी दिला आहे. तर कोल्हापूर जिल्हा साऊंड ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल असे सांगितले आहे.

अवघ्या महिनाभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे.यामुळे सर्व गणेश मंडळ आता तयारीला लागले असून याच अनुषगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाव यासाठी पोलीस प्रशासन देखील तयारीला लागले आहे. विविध परवानग्या तसेच नियम मंडळांना घालून देण्यात येत असून गणेशोत्सवाच्या आगमना दिवशी आणि विसर्जना दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना देखील नियम घालून देण्यात आले आहेत. यासाठी आज कोल्हापुरातील अलंकार हॉल येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमी वरती आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्ह्यातील सर्व साऊंड मालक, चालक, ऑपरेटर आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व घटकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या सर्वांना कायद्याचे महत्त्व सांगत नियमांचं उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा बाहेरून येणाऱ्या साऊंड सिस्टिमला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. गत वर्षी गणेश विसर्जनच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाले तसेच वेळेत मिरवणूक पुढे न सरकल्याने ही मिरवणूक तब्बल दोन दिवस चालली. तर लेझर लाईट मुळे अनेकांच्या डोळ्याला दुखापत झाली तसेच मोबाईलचे कॅमेरे देखील खराब झाले यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी घालण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. तसेच साउंड सिस्टीम बाबत घालून दिलेल्या नियमाचे पालन झाले पाहिजे. कार्यकर्त्यांचा कितीही दबाव आला तरी कायदानुसार ४५ डेसिमलच्या वरती डॉल्बी किंवा साऊंडचा आवाज जाता कामा नये याची काळजी व्यावसायिकानी घ्यावी अन्यथा कारवाई अटळ आहे. एक दिवस तुमचा असेल, पण ३६४ दिवस आमचे आहेत. लक्षात ठेवा, आमच्याशी पंगा घेऊ नका, असा इशारा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे.

असे आहेत नियम व अटी:

प्रत्येक मंडळाने मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असून मंडळाने परवानगी घेतली आहे का नाही याची खात्री साऊंड चालकांनी करावी आणि मगच त्यांची सुपारी घ्यावी, असे आवाहनही यावेळी पोलिसांनी केले. मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणारे ट्रॅक्टर आणि ट्रेलर या दोघांचेही लायसन असणे बंधनकारक आहे, अन्यथा आणि मालक दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच ट्रेलर वरील देखावा उभारण्यासाठी करण्यात आलेल्या स्ट्रक्चर हे तीन मीटर पेक्षा जास्त नसावा स्ट्रक्चर हे केवळ ८ बाय १० मध्ये उभा करावा. मंडळांना सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळावी यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार असून सर्वांनी पोलीस प्रशासना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी केले आहे.या बैठकीला जिल्हा पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपाधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव यांच्यासह आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed