आता २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला भाषण करणारा कार्तिक वजीर स्वातंत्र्य दिनाला गप्प बसेल, असं तर होणार नव्हतंच. आज देखील त्यानं भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जोरदार भाषण केलं. गावातील शाळेसमोर उभं राहून स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात कार्तिक उर्फ भुऱ्या वजीर यानं जोरदार भाषण केलं.
भुऱ्याच्या भाषणात काय होतं?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.इंग्रजांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केले,आपले शोषण केले.त्याचेच फळ ते आज भोगत आहेत.आज इंग्रज देशाचा पंतप्रधान भारतीय वंशाचा आहे.म्हणून म्हणतो कोणत्याही गोष्टीची अती केली की अति तिथे माती होते.तुम्हाला क्रांतिकारांनी स्वातंत्र्य मिळवून दिले म्हणून तुम्ही कुठेही काहीही बोलू शकत नाही.बोलायचे स्वातंत्र्य दिले म्हणून महापुरुष यांच्याविरुद्ध अपशब्द बोलू शकत नाही.उचलली जीभ अन् लावली टाळ्याला असं करू नका,नाहीतर लोक तुडूतुडू मारतील असं म्हणून भुऱ्यानी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
कुठेही व्हिडिओ काढू नका. तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून उघडे राहू नका. कोणत्याच गोष्टीचा अतिरेक करू नका नाहीतर लोक तोंडावर थुकतील. कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले म्हणून ज्यांनी आपल्याला मोठे केलं त्यांना सोडून जाऊ नका.एव्हढं बोलून मी माझे भाषण थांबवतो, नाहीतर पुन्हा म्हणाल भुऱ्याला स्वातंत्र्य दिलं तर फार बडबड करतो, असं म्हणून कार्तिक वजीर यानं भाषण संपवलं.
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील कार्तिक वजीर यानं आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत त्वेषपूर्ण भाषणाने त्यांनी आज पुन्हा शाळेचा मंच गाजवला. सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत त्याने आपल्या भाषणाची सुरुवात केली तेव्हा उपस्थित विद्यार्थी देखील हेलावून गेले.
आपल्या डोळ्यांच्या आजारावर मात करत हा कार्तिक आपल्या त्वेषपूर्ण भाषणाद्वारे उपस्थितांना गुंतवून ठेवतो.