पक्षफुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीला आले होते. आज सकाळीच त्यांनी गोविंदबागेत पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवर आपलं मत मांडलं. ठाण्याच्या रूग्णालयात झालेले १८ मृत्यू, धगधगतं मणिपूर, अजितदादांची भेट अशा मुद्द्यांवर शरद पवारांनी त्यांच्या स्टाईलने उत्तरे दिली.
ज्यांची भूमिका भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची आहे, त्यांच्याशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असे स्पष्ट करतानाच भाजपबरोबर जाणार नाही, असं शरद पवार यांनी नि:क्षून सांगितलं. तसेच आमची भूमिका आमची स्वच्छ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणताही संभ्रम नाही. कालही सोलापूरला असताना या सर्व गोष्टी मी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे एकाच भेटीवरून सतत तेच तेच प्रश्न विचारून पत्रकारांनी संभ्रम वाढवण्याची गरज नाही, अशा शब्दात पवारांनी पत्रकारांनाच खडसावलं.
सामनाच्या वर्तमानपत्रात आज छापून आलेल्या एका लेखाबद्दलही शरद पवार यांनी पत्रकारांना दटावलं. त्यांनी काय लिहिलंय, हे मी काय सांगू शकतो, ते त्यांनाच विचारा ना… असं म्हणत शरद पवारांनी पत्रकारांना झापलं. मी माझं मत सांगू शकतो, दुसऱ्याच्या म्हणण्यावर मी काय बोलणार? असं ते म्हणाले.
महाविकास आघाडीची बैठक ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी हॉटेल ‘हयात’ येथे होणार आहे. यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे दिलेली आहेत. या बैठकीचं आयोजन करण्या संदर्भातील जबाबदारी मी स्वतः, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी घेतलेली आहे. ही बैठक आम्ही यशस्वी करू, असेही पवार म्हणाले.
राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडलेला नाही. अगदी बारामतीसारख्या ठिकाणी देखील टँकर मागवावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही भागांमध्ये लोक चारा छावणीची मागणी करू लागले आहेत. पाऊस पडला नसल्यामुळे पेरण्या तर झाल्या परंतु उगवण झालेली नसल्यामुळे त्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.