विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परमनंट आरोग्याच्या दृष्टीने अॅडमिट करायचं आणि आरोग्याचं कारण पुढे करुन राजीनामा घ्यायचा आणि अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करायचा प्रयत्न तर सुरु नाही ना, अशी शंका घेण्यासाठी पूर्ण वाव आहे” असं विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
“कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधिमंडळ अधिवेशन काळातील सहभागसुद्धा अत्यंत कमी होता. तेरा दिवसांच्या अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत केवळ दोन वेळा गेले, तर विधानसभेत चार वेळा. त्यांची उपस्थितीही दीड-दोन तासांची होती. ही उपस्थिती, त्यांचा सहभाग, सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं टाळणं, आराम करायला बाहेर जाणं, तब्येतीची काळजी घेणं शंकास्पद आहे” असं वडेट्टीवार म्हणाले.
“एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राला त्यांच्या तब्येतीची काळजी असते, त्यामुळे याबाबत खुलासा स्पष्ट होणं अपेक्षित आहे. ते एका पक्षाचे नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत.” असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.