स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने दरवर्षी १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ तारखेला रात्री १२ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा केला जातो. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मध्यरात्रीच्या झेंडावंदनाला मोठी गर्दी उसळली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडले. तर स्थानिक पोलिसांनी ठाकरे गटाला दिलेल्या नोटिसीनंतरही ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हेदेखील आपल्या कार्यकर्त्यांसह झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेला छावणीचे स्वरूप पाहायला मिळाले होते.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या ध्वजारोहणाचा उपक्रम हा पारंपरिक असून आनंद दिघे यांच्या पश्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम न चुकता पार पाडतात. मात्र गेल्या वर्षी झालेल्या वादाचा प्रकार टाळण्यासाठी ठाकरे गटाने शिवसेना चंदनवाडी शाखेबाहेर अशाच पद्धतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली व केदार दिघे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत असून सर्व शिवसैनिकांनी आपल्या कुटुंबासोबत या सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केदार दिघे यांनी केली आहे.
जिल्हाशाखेत मुख्यमंत्री करणार ध्वजारोहण
तलावपाळी येथील शिवसेना जिल्हा शाखेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ध्वजारोहण करणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या परंपरेला मुख्यमंत्री शिंदे पुढे नेत असून या ठिकाणी हजारो निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित राहतील.
– नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर प्रवक्ते.