राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचं कळवलं आहे. निवडणूक आयोगानं प्रश्न विचारले, त्या नोटीसचं मी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय धोरणात भाजप बरोबरची युती बसत नाही त्यामुळं आम्ही कुणीही भाजपसोबत नाही. आमच्यातल्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यात काही परिवर्तन होईल का असा प्रयत्न आमचे हितचिंतक करतात त्यामुळं ते सुसंवाद साधायचा प्रयत्न करतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
मुंबई ३१ ऑगस्टला आणि १ सप्टेंबरला इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीला वेगवेगळ्या पक्षांचे ३० ते ४० नेते उपस्थित राहतील. या बैठकीचं आयोजन मी स्वत: , उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी केलं आहे.दोन बैठका झाल्या आहेत आता काही प्रश्न घेऊन चर्चा करायची गरज आहे. त्यामुळं मुंबईतील बैठक महत्त्वाची आहे, असं शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. सत्ताधारी फोडाफोडी करतोय हे लोकांना पसंत पडत नाही. सामान्य लोकं मतदानाच्या वेळी निर्णय करतील, असं शरद पवार म्हणाले.
मणिपूर प्रश्न देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. पलीकडे म्यानमार आहे. ईशान्य भारत हा संवेदनशील भाग आहे. संसदेत ईशान्य भारतातील प्रश्न आला की गांभीर्यानं बोलायचं असं आतापर्यंत तसं व्हायचं. दुर्दैवानं पंतप्रधानांनी जे उत्तर दिलं त्यात मणिपूरचा उल्लेख पुरेसा केला नाही. त्यांच्या भाषणात लोकांच्या समस्यांकडे लक्ष नव्हतं. राजकीय हल्ले करता येतील असे त्यांनी केलं ते बरोबर नव्हते, असं शरद पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी त्यांचं मत सांगितलं आहे. पण मला त्यांच्या बरोबर जाऊन काही व्हायचं नाही असं शरद पवार मोदींच्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्याविषयी म्हणाले.
लोक ज्यावेळी मत देण्याची वेळ येईल त्यावेळी निर्णय घेतील. आम्ही जेव्हा एकत्र असो किंवा होतो, पुढे एकत्र येऊ पण भाजप ही विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही, असं शरद पवार म्हणाले. ईडी, सीबीआय आणि तत्सम संस्था विरोधकांच्या विरोधात वापरणं सुरु आहे. पण, विरोधक त्याचा भक्कमपणे सामना करत आहेत, असं शरद पवार म्हणाले.
काही लोक भेटतात, काही लोक दु:खी आहेत. जे लोक गेले ते दुसऱ्या लोकांमार्फत सागंतात झालं गेलं सांभाळून घ्या. २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील पक्षाच्या हातात राज्याची जनता सत्तेची सूत्रं देईल, असं शरद पवार म्हणाले.