काय प्रकरण?
गोंडखैरी परिसरात प्रवीण व त्याचा साथीदार नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती कळमेश्वर पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी सापळा रचून प्रवीणला अटक केली. त्याच्याकडून ४८ हजार ७०० रुपयांच्या १००च्या नोटा जप्त केल्या. विशाल आनंद यांनी या प्रकरणाचा सखोल व समांतर तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हेशाखेला दिले. गुन्हेशाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, साहाय्यक निरीक्षक राजीव कर्मलवार, दिलीप पोटभरे व त्यांचे सहकारी सिंधी येथे गेले. तेथे शोध घेऊन आकाश व धीरजला अटक केली. दोघांना कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले.
ऑनलाइन जुगारात हरला दीड लाख
आकाश हा उच्चशिक्षित असून त्याला कम्प्युटरचे उत्तम ज्ञान आहे. ऑनलाइन जुगारात तो दीड लाख रुपये हरला. त्यामुळे त्याला पैशाची गरज होती. याचदरम्यान त्याची धीरजसोबत ओळख झाली. कम्प्युटरद्वारे बनावट नोटा तयार करण्याची योजना त्याने धीरजला सांगितली. नोटा चलनात आल्यास त्यातील ३० टक्के रक्कम ही धीरजला मिळायची. धीरजने प्रवीण व अल्पवयीन मुलाला कळमेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गोंडखैरी येथे बनावट नोटा चलनात आणाण्यास पाठविले. आकाशने आणखी कुणाला या बनावट नोटा दिल्या, याचा तपास पोलिस करीत आहेत.