नीलेश महादेव काकडे (वय ४०, रा. ओगलेवाडी, ता. कराड, सध्या रा. जाधववाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी नीरा नदीच्या पुलावर आपली दुचाकी लावून त्याने नदीपात्रात उडी घेतली होती. पुलावर मिळालेल्या गाडीवरून संबंधिताने नदीत आत्महत्या केली असावी असा तर्क करून त्यानुसार शोध मोहिमेला गती देण्यात आली होती.
महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम महाबळेश्वर, शिरवळ रेस्क्यू टीम यांच्याकडून गुरुवारी (दि. १०) सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासून ही शोध मोहीम शर्थीने राबवली जात होती. या मोहिमेत अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुलापासून पुढे जवळपास १५ किलोमीटर अंतरावर राजापूर स्मशानभूमीजवळ नदीच्या प्रवाहात निलेश काकडेचा मृतदेह मिळून आला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हा मृतदेह इतका लांबवर वाहत गेला होता.
शुक्रवारी सकाळपासून ही मोहीम राबवली जात असताना त्याचे नातेवाईकही उपस्थित होते. दुःख, अस्वस्थता आणि खिन्नतेने ते हताश झाले होते. मृतदेह मिळून आल्यानंतर मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. शिरवळ पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.