गोंदिया वनविभागातील गोरेगाव वनपरिक्षेत्रातून जाणाऱ्या कोहमारा ते गोंदिया राज्य महामार्गावर मुरदोली गावानजिक गुरुवारी रात्री हा अपघात झाला. रात्री ९.३० च्या सुमारास क्रेटा कारच्या धडकेत हा वाघ जखमी झाल्याची बातमी वन विभागाला मिळाली होती. वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला वाघ जंगलात निघून गेला. रात्रीच्या अंधारात टॉर्चचा वापर करून रस्त्यालगतच्या जंगलात वनकर्मचाऱ्यांनी वाघाचा शोध घेतला. मात्र, वाघ न सापडल्याने शोध थांबविण्यात आला. वन विभागाने शुक्रवारी पहाटे पाच वाजता शोधकार्याला सुरुवात केली.
जमिनीवर जखमी अवस्थेत बसून असलेल्या या वाघाला पकडण्यासाठी त्याला बेशुद्ध करणे गरजेचे होते. त्याकरिता, राज्याच्या वन्यजीव विभागप्रमुखांची परवानगी घेऊन त्यासाठी गोंदिया वन विभाग आणि नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे जलद बचाव दल तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाघाला बेशुद्ध करण्यात आले. जेरबंद करण्यात आलेला या वाघाला पुढील उपचारासाठी नागपुरातील गोरेवाडा बचावकेंद्र येथे आणत असताना कोहमाराजवळ या वाघाचा मृत्यू झाला.
वाहनाच्या उघडल्या एअर बॅग्ज
अपघातात मरण पावलेल्या वाघाचे वय अंदाजे दोन वर्षे असून या परिसरात टी-१४ या वाघिणीचा शावक होता. भरधाव वाहनाची धडक इतकी जोरदार होती की वाघ प्रचंड जखमी झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये वाघाला चालणेही कठीण झाल्याचे दिसते आहे. या वाघाला पकडल्यानंतर तणावामुळे आणि अंतर्गत जखमांमुळे वाघाचा मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या धडकेत कारचेही मोठे नुकसान झाले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या दोन एअर बॅग्ज बाहेर आल्या. त्यामुळे, वाहनातील कुणालाही इजा झाली नाही.