• Sat. Sep 21st, 2024

त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनासाठी निघालात? मग ही गोड बातमी तुमच्यासाठी, मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय

त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनासाठी निघालात? मग ही गोड बातमी तुमच्यासाठी, मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजा बाजूस अद्ययावत सुविधांनी युक्त दर्शनबारी करण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांना अनेकदा दोन तासांवरही रांगेत उभे राहावे लागते. त्यामध्ये मधुमेह आजार असलेले तसेच ज्येष्ठ, महिला, मुलांना त्रास होतो. हा त्रास दूर करण्यासाठी मंदिर ट्रस्ट विश्वस्तांनी भाविकांसाठी दर्शनानंतर राजगिरा लाडू देण्यात येणार आहेत. तसेच रांगेत बिस्कीट पुडे, पाण्याची बाटली मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनासाठी राज्याराज्यांतून येणाऱ्या भाविकांना दर्शनबारीत अनेक तास थांबावे लागते. अशावेळी काही खाल्लेले नसेल तर त्यांची अडचण होते. अशावेळी मधुमेहसारखा आजार असलेले वयस्कर, लहान मुले यांना काही तास खायला मिळाले नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. एकदा रांगेत प्रवेश केलेला भाविक दर्शन घेऊन बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यास खाण्यासाठी काहीही उपलब्ध होत नाही. अशा भाविकांना रांगेत कधी तास दोन तास, तर कधी थेट चार तास थांबण्याची वेळ येते. लहान मुले आणि आजारी व्यक्ती कासाविस होत असतात. जवळ काही खाद्यपदार्थ असतील तर ठीक अन्यथा बाका प्रसंग ओढवण्याची शक्यता असते. यापूर्वी लहान मुलांनी रडून गोंधळ घालणे, आजार असलेल्यांना भोवळ येणे, तर कधी बेशुद्ध होणे असे प्रकार घडले आहेत. यासाठी नुकत्याच नियुक्त झालेल्या विश्वस्तांनी रांगेतील भाविकांना पारले-जी आणि मोनॅको बिस्कीट पुडे तसेच २०० मिली पाण्याची बाटली मोफत देण्याचा एकमताने ठराव केला आहे. यासाठी पुरवठादारांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. सुरुवातीला दोन महिने हा उप्रकम राबविण्यात येणार आहे.
मरणाने केली सुटका, अंत्यसंस्कारासाठी यातायात; मानवी साखळी करत नेला नदीतून मृतदेह
दहा-बारा दिवसांत अंमलबजावणी

त्र्यंबकेश्वर मंदिरात भक्ताने दर्शन घेतल्यानंतर तो रिकाम्या हाताने परत जाणार नाही. यासाठी दर्शनानंतर प्रत्येक भाविकाला दोन राजगिरा लाडू असलेले पॅकेट प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत. यासाठीदेखील नवनियुक्त विश्वस्तांनी निर्णय घेतला असून, पुरवठादार यांच्याकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. साधारणत: येत्या दहा ते बारा दिवसांत याची अंमलबाजवणी सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या प्रारंभापासून भाविकांना प्रसाद दिला जाणार असल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे. भाविकांमध्ये याबाबत समाधान व्यक्त होत असून, विश्वस्त मंडळाने भाविकांसाठी करीत असलेल्या सोयी-सुविधांबाबत शहरातही समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed