• Sat. Sep 21st, 2024
मित्रासोबत थांबलेल्या तरुणावर भर चौकात चाकूने वार; रक्ताच्या थारोळ्यात पडला अन् जीव सोडला!

यवतमाळ : जिल्ह्यात हत्येच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून क्षुल्लक कारणावरुन थेट एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. शहरातील सिंघानीया नगरात ६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोबाइल फोनवर झालेल्या क्षुल्लक वादातून एका तरुणाची धारदार चाकूने वार करीत हत्या करण्यात आली. सारंग नंदु बावीस्कर (२७, रा. सिंघानीया नगर, यवतमाळ) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी एलसीबी पथकाने प्रमुख मारेकरी सौरभ पंडागळे उर्फ हेकडी (२२) याच्यासह चौघांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी हर्षल (२३, रा. मोठे वडगाव, यवतमाळ) याने अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, शहरातील सिंघानीया नगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज फोटोजवळ रविवार रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हर्षल कांबळे आणि त्याचा मित्र सारंग बावीस्कर उभे होते. यावेळी हर्षल हा मोबाइलवर बोलत असताना त्याचा मित्र तेजस भेंडारकर याच्यासोबत वाद झाला. दरम्यान तेजसने हर्षलला शिवीगाळ केली आणि तू थांब तिथे मी येतो, असे म्हणाला. त्यानंतर अर्ध्या तासातच त्या ठिकाणी तेजस आणि त्याच्यासोबत तीन वेगवेगळ्या दुचाकीवर सौरभ पंडागळे उर्फ हेकडी आणि इतर सहा तरूणांची टोळी आली. या टोळक्याने हर्षल आणि सारंग या दोघांना लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. अशातच सौरभ पंडागळे उर्फ हेकडी याने धारदार चाकू काढून सारंग याच्या कमरेच्या खाली आणि हातावर सपासप वार केले.

बायको स्कुटीवरून येत होती, तिची मोपेड अडविली, पोराला जबरदस्तीने उचललं, बापाने स्वत:च्याच लेकराचं अपहरण केलं

या हल्ल्यात सारंग रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन पडला. दरम्यान हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. त्यानंतर सारंग याचा भाऊ तुषार तिथं आला. त्या दोघांनी सारंग याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु डॉक्टरांनी सारंग याची तपासणी करीत त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्यासह एलसीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केला. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही हत्याकांडात सहभाग

सारंग बाविस्कर याच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. यामध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. सात आरोपींपैकी चार पोलिसांच्या हाती आले आहे. यामध्ये सौरभ उर्फ हेगडी राजेंद्र पंडागळे (२०, रा. सिंघानिया नगर), तेजस संतोष भेडारकर (२०), आकाश संतोष लोखंडे (१९, रा. सिंघानिया नगर) यांचा समावेश आहे .गांजावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अटकेची कारवाई पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शक एलसीबी पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed