‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य एका कीर्तनादरम्यान राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुरुवातीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली. यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच संगमनेरच्या कनिष्ठ कोर्टाने याबाबतचा खटला चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टात आपल्याला दिलासा मिळेल, अशी आशा इंदुरीकर महाराजांना होती. मात्र आज कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत कनिष्ठ कोर्टाने खटला चालवण्याचा दिलेला आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे इंदुरीकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्माबाबत एक वक्तव्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांना जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं नोटीस बजावून खुलासा मागवला होता. त्यानंतर इंदुरीकरांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. इंदुरीकरांच्या कीर्तन कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी त्यांना समर्थन देणारे फलकही झळकावले होते.