मांडवी परिसरातील पात्र आदिवासींना 9 ऑगस्ट रोजी आयुष्यमान कार्डाचे होणार वाटप
▪️इतर पात्र लाभार्थ्यांनाही संधी
नांदेड -प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून देशभर “मेरी माटी मेरा देश” हे विशेष अभियान साजरे होत आहे. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील तेलंगणाच्या काठावर असलेल्या मांडवी येथे यानिमित्त आरोग्यासाठी विशेष उपक्रम घेतला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या समन्वयातून मांडवी परिसरातील पात्र लाभार्थ्यांना 9 ऑगस्ट रोजी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वाटप केले जाणार आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून प्राथमिक स्वरूपात आरोग्याची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट रोजी आपण साजरा करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्यांना जपत आदिवासी विकासासाठी कटिबद्ध होऊन शासन आपल्या विविध योजनांद्वारे प्रयत्नशील आहे. आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने किनवट येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यान्वित आहे. या कार्यालयामार्फत किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर या आदिवासी बहुल भागासह जिल्ह्यातील इतर आदिवासी बांधवांपर्यंत विविध विकास योजना पोहचविल्या जात आहेत. विविध योजनांसमवेत आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांना आरोग्याच्याही योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात 5 लाख 61 हजार 582 लाभधारकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जात आहे. यातील 42 टक्के लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचे कार्ड प्रशासनामार्फत पोहोचविण्यात आले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना संलग्नीकृत रूग्णालयात उपचारासाठी सुविधा देण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारानुसार 34 विशेष तज्ज्ञांकडे उपचार मिळतात. याचबरोबर 1 हजार 38 प्रकारचे उपचार संलग्नीकृत रुग्णालय व शासकीय रुग्णालयांतर्गत योजनेच्या नियमानुसार मोफत उपलब्ध आहेत. यासाठी आयुष्यमान कार्ड आवश्यक आहे.