• Mon. Nov 25th, 2024

    जयंत पाटलांच्या भेटीनंतर ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘आमचं ठरलंय…!’

    जयंत पाटलांच्या भेटीनंतर ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘आमचं ठरलंय…!’

    मुंबई : शरद पवार यांचे विश्वासू नेते तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजितदादा यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा वेगात सुरू होत्या. दुपारी पत्रकार परिषद घेऊन या चर्चा म्हणजे कंड्या पिकविण्याचं काम असल्याचे सांगत मी कुठेही जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती जयंत पाटील यांनी दिली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर करून ‘आमचं ठरलंय-लढायचं’ अशा आशयाचं ट्विट केलंय. त्याचवेळी संभ्रम निर्माण करण्यासाठी काही जणांकडून अशा बातम्या पसरविण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.

    जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे. जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले, ते मंत्री होणार, त्यांनी गावातून लोक बोलावले,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातेय, हे आम्हांला बरोबर समजतंय.
    जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की,”जितेंद्र साहेबांनी इशारा दिलेला आहे की आपल्याला लढायचंय आणि आता थांबणे नाही. मला वाटत नाही की, प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की आम्ही लढणार आहोत, आम्ही लढणार आहोत. आम्ही मागेच सांगितलं आहे की आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही”.

    तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचं ठरलंय… आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणं ही काळाची गरज आहे आणि ते जर आम्ही केलं नाही तर पुढची पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते जाते, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हाला कधीच क्षमा करणार नाही.

    अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेनं राजकीय वातावरण तापलं, जयंत पाटील मीडियासमोर येत म्हणाले…
    मी कुणाला भेटलो नाही, मी पवारांची साथ सोडणार नाही, जयंतरावांची स्पष्टोक्ती

    अमित शाह यांच्याशी माझी कुठलीही भेट झालेली नाही. माझी त्यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाहीये, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दादा गटातल्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या बातम्यांचं खंडन केलं. अजित पवार यांच्या गटात जाण्यासंबंधीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. मी मुंबईत आहे. मी शरद पवार यांची साथ सोडणार, या बातम्यांनी माझी करमणूक होतेय. पण या बातम्या आता थांबवा, अशी विनंती जयंतरावांनी प्रसारमाध्यमांना केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed