कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कार्यक्रमस्थळाला भेट दिली. कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक स्तरावर करून घेण्यात आली आहे. विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी दालने उभारण्यात येणार आहेत.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचेही दालन असणार आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे नागरिकांची निवेदने स्वीकारण्याची सुविधाही येथे असणार आहे. याच ठिकाणी रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील उत्पादनांची माहिती देणारे ‘मेक इन पुणे’ प्रदर्शन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात येतील. त्यासाठी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेने गावपातळीवरील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाहतूक मार्गात बदल
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम; तसेच जेजुरी विकास आराखड्याचे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहेत. या वेळी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केला आहे. सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करून, अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.