• Mon. Nov 25th, 2024

    पनवेल RTO चं आरोग्य शिबीर, वाहनचालकांची तपासणी अन् धक्कादायक बाब समोर, काय घडलंं?

    पनवेल RTO चं आरोग्य शिबीर, वाहनचालकांची तपासणी अन् धक्कादायक बाब समोर, काय घडलंं?

    म. टा. वृत्तसेवा, पनवेल : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून तळोजा ब्रेक टेस्टिंग ट्रॅक येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनचालकांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या एकूण १०४ वाहनचालकांपैकी तब्बल ७४ जणांची दृष्टी सदोष असल्याचे आढळून आले आहे.

    भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. भारतातील रस्ते अपघातांच्या कारणांचे विश्लेषण केले असता, बहुतांश अपघातांस वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालवण्याच्या कौशल्यात चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यादृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनचालकांसाठी नेत्रतपासणी व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. पनवेल उप्रादेशिक कार्यालयाला रस्ता सुरक्षा निधीतून पाच लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शुक्रवारी १०४ वाहनचालकांची मोफत नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे १०४ पैकी ७४ वाहनचालकांच्या डोळ्यांमध्ये दोष आढळला असून, त्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. तर, चार वाहनचालकांच्या डोळ्यांमध्ये गंभीर दोष आढळले आहेत. नेत्रदोष आढळलेल्या चालकांच्या टक्केवारीचा विचार केल्यास ७५ टक्के चालकांचे डोळे सदोष असल्याचे समोर आले आहे.

    नागपूर जिल्ह्यावर आरोग्यसंकट! कुष्ठरोगाचे रुग्ण वाढलेत, वर्षभरात चिंता वाढवणारी आकडेवारी समोर
    चालकांना पुढील उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. पुढील महिनाभरात तीन ते चार ठिकाणी शिबीर घेऊन वाहनचालकांना ही सेवा दिली जाईल, वाहनचालकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अनिल पाटील यांनी केले. वाहनचालकांना ‘रोटरी क्लब ऑफ इंडिया’च्या पनवेल सेंट्रल शाखेचे प्रेसिडण्ट रतन खरोळ, रोटरी क्लब शाखा पनवेलचे मिडटाऊनचे अध्यक्ष महेश फुलपगार यांनी मार्गदर्शन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते, मोटार वाहन निरीक्षक चंद्रकांत माने, योगेश शितोळे, विकास माळवे यांच्यासह सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी विशेष प्रयत्न केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed