शासनाचे महानगरपालिकेला दिले २ पर्याय
कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा प्रश्न गेली वर्षभर प्रलंबित होता. जयप्रभा स्टुडीओची जागा कोल्हापूरची अस्मिता असून कोल्हापूरवासीय आणि कलाकारांच्या भावनांचा अनादर होणार नाही. स्टुडीओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून, स्टुडीओच्या विकासासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली होती. आता त्यांच्या या प्रयत्नास यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने या जागेबाबत निर्णय घेण्याचे दोन पर्याय कोल्हापूर महानगरपालिकेला दिले आहेत. यामध्ये पर्याय एक नुसार कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडीओच्या जागेच्या मोबदल्यात श्री. महालक्ष्मी स्टुडीओ एल.एल.पी.फर्म यांना पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन सदर जागा ताब्यात घ्यावी. अन्यथा पर्याय दोन नुसार पर्याय एक प्रमाणे कार्यवाही शक्य नसल्यास सदर जागेतील हेरीटेज जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत जमीन मालकास बांधकामास परवानगी देवून विकास हस्तांतरणीय हक्क (TDR) उपलब्ध करून देण्यात यावा, असा निर्णय ३ ऑगस्ट रोजी दिला आहे. यामुळे जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा विषय निकाली निघाला आहे.
काँग्रेस नेत्यांकडून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. वास्तविक पाहता हा प्रश्न निकाली लागण्याच्या स्थितीत असताना यावर सकारात्मक कार्यवाही होत असताना यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात आला. भारतरत्न लता मंगेशकर आणि महालक्ष्मी एल.एल.पी. फर्म मध्ये कायदेशीर व्यवहार झाला आहे. भारतीय कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या सज्ञान व्यक्तीला जागा खरेदी -विक्री करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अशी सत्यपरिस्थिती असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याच्या हेतूनेच जनता आणि कलाकारांमध्ये गैरसमज पसरविण्याचा डाव आखला गेला. मात्र आता या जागेबाबत शासनाने दिलेला निर्णय हा जनभावनांचा विजय असून यापुढेही जावून कोट्यावधींचा निधी या स्टुडिओस उपलब्ध करून या जागेत चित्रिकरणासाठी आणि कलाकारांसाठी आवश्यक बाबी पुरवून स्टुडिओचा विकास करण्यास प्रयत्नशील आहे, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.
काय आहे प्रकरण
कोल्हापूरतील सर्वात जुने आणि हजारो चित्रपटांचा साक्षीदार असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याची माहीती समोर आली होती. ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा करोना काळात दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले. ही जागा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे दोन सुपुत्र आणि आणखी आठ जण या मिळून भागीदारीमध्ये श्री.महालक्ष्मी स्टुडीओ एल.एल.पी.फर्म या नावाने खरेदी केल्याचे समोर आले होते. यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून साखळी उपोषण करण्यात आले होते. दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागा सरकारने ताब्यात घेऊन सदर फर्मला दुसरी जागा द्यावी आणि जयप्रभा स्टुडिओचा विकास करावा, असे पत्र दिले होते. यानंतर तब्बल वर्षभराच्या लढ्यानंतर अखेर कलाकारांच्या लढ्याला यश मिळत आहे.