• Mon. Nov 25th, 2024

    न्या. देव यांच्या राजीनाम्याच्या कारणावरून विधी क्षेत्रात कुजबूज; वादग्रस्त निर्णयामुळे होणार होती…

    न्या. देव यांच्या राजीनाम्याच्या कारणावरून विधी क्षेत्रात कुजबूज; वादग्रस्त निर्णयामुळे होणार होती…

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर

    न्या. रोहित देव यांनी दिलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे तसेच अन्य काही निर्णयांमुळे त्यांची दुसऱ्या राज्यात बदली करण्यात येत होती. ही वागणूक अपमानास्पद वाटल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांमध्ये आहे. त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती, असे कळते.

    ऑक्टोबर २०२२मध्ये न्या. देव आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने कुख्यात माओवादी प्रा. साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. खुद्द गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले होते. सबळ पुरावे असताना केवळ एका तांत्रिक मुद्द्यावरून माओवादाचा आरोप असलेल्याची सुटका करणे चुकीचे आहे, असे विधान केले होते. राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयावर स्थगिती आणली होती. पुढे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल निलंबित करीत हे प्रकरण परत एकदा उच्च न्यायालयाकडेच पाठविले. मात्र, या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्तिद्वय देव व पानसरे यांच्यासमक्ष होऊ नये, असे स्पष्ट नमूद केले होते. यामुळे विधी क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

    न्यायमूर्ती रोहित देव यांचा खुल्या न्यायालयात राजीनामा; माफी मागताना म्हणाले, कोणाबद्दलही कठोर भावना नाही
    समृद्धीच्या कंत्राटदारांना फटका

    समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्यांवर कंत्राटदारांना मुरूमचोरीचा आरोप आहे. यात या कंत्राटदारांचा कोट्यवधींचा दंड माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला न्या. देव यांनी गेल्या आठवड्यात स्थगिती देत राज्य सरकारला नोटीस बजावली होती. यामुळे राज्य सरकार व कंत्राटदारांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जाते.

    खुल्या न्यायालयातच राजीनाम्याची घोषणा करणारे कदाचित पहिलेच न्यायमूर्ती

    ‘आज या न्यायालयात हजर असलेल्या प्रत्येकाची मी माफी मागतो. मी अनेकदा तुम्हाला रागावयचो, कारण तुमच्यात सुधारणा व्हावी असे मला वाटायचे. मला कुणाला दुखवायचे नव्हते, कारण आपण सगळे एका कुटुंबासारखे आहोत. मला तुम्हाला हे सांगताना खेद होतो आहे की मी राजीनामा दिला आहे. तुम्ही सगळे मेहनत करा, चांगले काम करा,’ हे न्यायमूर्ती रोहित देव यांचे न्यायमूर्ती म्हणून अखेरचे शब्द होते.

    न्या. देव यांनी सकाळी १०.३०च्या सुमारास आपला राजीनामा राष्ट्रपतींना पाठविला. सुरुवातीला त्यांनी ही बाब खंडपीठातील आपल्या इतर सहयोगी न्यायमूर्तींना सांगितली. त्यानंतर त्यांनी खुल्या न्यायालयात येत आपण राजीनामा दिला असून आपण आजची प्रकरणे ऐकणार नसल्याचे सांगत त्यांच्या खंडपीठासमक्ष लागलेली प्रकरणे स्थगित केली. खुल्या न्यायालयातच राजीनाम्याची घोषणा करणारे न्या. देव हे कदाचित पहिलेच न्यायमूर्ती असतील. यामुळे विधी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. अनेक हायकोर्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी व इतर वकिलांनीसुद्धा त्यांना भेटून हा निर्णय परत घेण्याची विनंती केली. काहींच्या डोळ्यात अश्रूही तरळले. मात्र, आपला निश्चय कायम असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयाच्या परिसरातून काढता पाय घेत थेट सरकारी बंगला गाठला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed