• Mon. Nov 25th, 2024

    वनविभागाच्या परीक्षेत गैरप्रकार नाही – वनविभागाचा खुलासा

    ByMH LIVE NEWS

    Aug 4, 2023
    वनविभागाच्या परीक्षेत गैरप्रकार नाही – वनविभागाचा खुलासा

    मुंबई, दि. 4 : वन विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया टी.सी.एस.- आय.ओ. एन. यांच्यामार्फत 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षेद्वारे (ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न) घेण्यात येत आहे.  प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका शिफ्टनिहाय वितरण करणे, परीक्षा घेणे, निकाल प्रकाशित करणे याबाबतची टीसीएस आयओएन या कंपनीची यंत्रणा ही अत्यंत गोपनीय मजबूत व अत्यंत सुरक्षित आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या बातम्या निराधार, तथ्यहीन व चुकीच्या असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे.

    वनविभागाची परीक्षा टी.सी.एस.आय.ओ.एन. या कंपनीकडून घेण्यात येत असून वनविभागाकडून परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावणे तसेच वरिष्ठांकडून परीक्षा केंद्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त उमेदवारांना व नागरिकांना https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावरूनही सूचनावजा आवाहन करण्यात आले असून अतिरिक्त दक्षता घेण्यात आली आहे. याचबरोबर नागपूर येथून परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची गंभीरतेने दखल घेऊन याबाबत सतर्क राहण्याबाबत पोलीस आयुक्त, नागपूर शहर, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक, वर्धा, पोलीस अधीक्षक, भंडारा व पोलीस अधीक्षक गोंदिया यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पोलीस विभागाच्या सायबर सेललासुद्धा सतर्क राहण्याचे व भरती प्रक्रियेसंदर्भात समाज माध्यमांमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या असल्याचे वनविभागाने कळविले आहे.

    माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या घटना औरंगाबाद जिल्ह्यातील नेमून दिलेल्या सात परीक्षा केंद्रांवरील नसून ती खासगी अॅकेडमी असून त्याबाबत पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू आहे यामध्ये उल्लेखित राणा अॅकेडमी परीक्षा केंद्राचा वन विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रामध्ये समावेश नसल्याचे, वन विभागाने स्पष्ट केले आहे.

    या परीक्षेदरम्यान गैरकृत्य करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध रीतसर पोलीस कारवाई करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. यासंदर्भात वन विभागाचे कक्ष अधिकारी वि. श. जाखलेकर यांनी खुलासा प्रसिद्धीस दिला आहे.

    ०००००

    दीपक चव्हाण/ विसंअ/

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed