या गावात खासगी शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलींवर दबाव आणून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार आहे. यासंबंधी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. तर त्याच्या आधी गावातील प्रार्थनास्थळाची तोडफोड झाल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे. त्यातही पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार लाड गावात येऊन गेले. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चाही केली.
त्यानंतर आता पुन्हा गावकऱ्यांनी आमदार लाड यांना एक पत्र पाठविले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित मंत्र्यांना पत्र न पाठविता लाड यांनाच हे पत्र पाठविण्यात आले आहे. सरपंच सुरेश साबळे आणि ग्रामविकास अधिकारी एम. एन. रगड यांच्या सहीसह हे पत्र पाठविण्यात आले आहे.
पत्रात म्हटले आहे की, उंबरे गावातील प्रत्येक पालकांनी असे ठरविले आहेत की, आमच्या मुलींना आम्ही शाळेत पाठविणार नाही. त्यांचे शाळेत जाणे आम्ही कायमस्वरूपी बंद करत आहेत. आम्ही सर्व पालक, मुली व ग्रामस्थ या घटनेने प्रचंड दहशतीखाली जीवन जगत आहोत. जर आम्ही या समान व्यवस्थेत षडयंत्राचे बळी ठरत असू आमच्या लेकी बाळींना घरातून पळवून नेण्याचे कट रचले जात असतील, पिडीत मुलींच्या व कुंटुंबाच्या रक्षणार्थ मदतीला धावून येणा-या हिंदू बांधवानां खोटया गुहयात अडकवून पशुवत मारहाण केली जात असेल. रक्षक म्हणून आमच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी प्रशासनच आमचे भक्षक होत असतील तर आम्ही आमच्या मुली शाळेत पाठवयाच्याच कशाला?
आमच्या मुली घरी राहुन शेतात खुरपणी करतील. लोकांची धुणी-भांडी करतील पण या दहशतीखालचे शिक्षण आमच्या मुलीना नको. जोपर्यंत आरोपीना कठोरातील कठोर शिक्षा होत नाही, पिडीत मुलींना न्याय मिळत नाही, खोटे गुन्हे दाखल करणा-या संबंधित अधिका-याविरुद्ध कडक करवाई होत नाही, अटकेत असणा-या हिंदू बांधवावरील खोटे गुन्हे मागे घेत नाही, तसेच आमच्या मुलींना सुरक्षततेची हमी देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुली शाळेत पाठविणे बंद करीत आहोत, असे पत्रात म्हटले आहे.