शरद पवार, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती फिरणाऱ्या पाच महत्त्वाच्या व्यक्ती एकाच वेळी एकाच मंचावर एकत्र आल्याने अख्ख्या देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिलं होतं. भाषण करताना प्रोटोकॉलनुसार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन दोन तारखेला एक महिना पूर्ण होत आहे. या महिन्याभरात जाहीर मंचावर दोघं पहिल्यांदाच एकत्र आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री बैस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री दोन आहेत, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, असं म्हणत शरद पवारांनी भाषणाला सुरुवात केली. देशात पुणे शहराला विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास जगाला माहिती आहे. शिवरायांचा जन्म याच जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि इथल्याच लाल महालात त्यांचं बालपण गेलं. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला इथूनच सुरुवात झाली, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं.
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट यांची एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली. शरद पवार यांच्यासह विरोधकांनी मोदींच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केल्यानंतर पवार-मोदी एकाच मंचावर येणं महत्त्वाचं मानलं जातं. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधानंतरही पवारांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
शरद पवार यांनी मंचावर नरेंद्र मोदी यांना अभिवादन करताना आधी हसत-हसत हस्तांदोलन केले, तर त्यानंतर त्यांची पाठही थोपटली. हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून सुटले नाही. पुढे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेही होते. तर त्यानंतर लोकमान्यांचे वंशज रोहित टिळक यांनी नरेंद्र मोदींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
दरम्यान, नमामि गंगे योजनेसाठी पुरस्काराची रक्कम दान करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.