• Mon. Nov 25th, 2024
    PM मोदींना टिळक पुरस्कार, पवारांच्या अख्ख्या भाषणात फक्त एका ओळीत अभिनंदन, नेमकं काय बोलले?

    पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पुण्यात संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये भाजप आणि मोदी राजवटीचे कट्टर वैचारिक विरोधक शरद पवार हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यामुळे मोदींना पुरस्कार देण्यापूर्वी शरद पवार भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचे बोलण्यासाठी अनेकांचे कान टवकारले गेले होते.

    मात्र, आपल्या संपूर्ण भाषणात शरद पवार यांचा मुख्य रोख छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या देशासाठीच्या योगदानावर राहिला. भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी केवळ एका ओळीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांचे अभिनंदन केले. यापलीकडे शरद पवार मोदींविषयी फारसे बोलले नाहीत. टिळक पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. टिळक स्मारकाने या पुरस्कारासाठी मोदींची निवड केली. यापूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार हा इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंह यांना मिळाला होता. या नेत्यांच्या पंक्तीत नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला, याचा आनंद आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी म्हटले. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा बहुतांश भाग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्यात खर्च केला. त्यामुळे या दोन भाषणांमधील विरोधाभासाची चांगलीच चर्चा रंगली होती.

    फुटीनंतर काका-पुतण्या पहिल्यांदाच एका मंचावर, शरद पवारांनी नाव घेताच अजितदादांनी कान टवकारले

    शरद पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने केली. शिवरायांचा जन्म आणि बालपण पुणे जिल्ह्यात गेलं. याचठिकाणी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हा पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे या देशात अनेक राजे होऊन गेले पण त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जायचे. पण शिवाजी महाराजांनी उभारलेलं राज्य भोसल्यांचं राज्य नव्हे तर रयतेचं राज्य होतं, हिंदवी स्वराज्य होते. अलीकडच्या काळात या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्याची मोठी चर्चा झाली. पण लाल महालात पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या काळात झाला होता, ही गोष्ट विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

    यानंतर शरद पवार यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख केला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध सामान्य माणसांमध्ये जनजागृती करण्यासाठी पत्रकारितेचा शस्त्र म्हणून वापर केला. त्यांनी केसरी आणि मराठा ही दैनिकं सुरु केली, असे शरद पवार यांनी म्हटले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *