• Mon. Nov 25th, 2024

    उजव्या पायातील रॉड काढायला गेला, डॉक्टरने डाव्या पायाचं ऑपरेशन केलं, वैतागलेल्या रुग्णाने…

    उजव्या पायातील रॉड काढायला गेला, डॉक्टरने डाव्या पायाचं ऑपरेशन केलं, वैतागलेल्या रुग्णाने…

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक-पुणे मार्गावरील एका खासगी नामांकित रुग्णालयात उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रियेसाठी काप देण्यात आल्याने डॉक्टरविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विपुल काळे (४२) असे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टराचे नाव असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळेच आपण दोन्ही पायांनी अधू झाल्याचे रुग्णाचे म्हणणे आहे. रुग्णाच्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात कलम ३३७ व ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुभाष काशिनाथ खेलूकर (५९, रा. रुद्रप्रेम अपार्टमेंट, दसकगाव, जेलरोड, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार – खेलूकर यांच्या उजव्या पायात रॉड टाकण्यात आलेला होता. तो काढण्यासाठी त्यांनी नाशिक-पुणे मार्गावरील नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉ. विपुल काळे यांना दाखविले होते. त्यानुसार, शस्त्रक्रिया करून रॉड काढण्याचा निर्णय झाला होता. खेलूकर हे गेल्या २७ मे २०२३ रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. डॉ. काळे यांना रुग्णाच्या उजव्या पायाचे ऑपरेशन करावयाचे आहे, हे माहीत होते. तरीही प्रत्यक्षात डॉ. काळे यांनी खेलूकर यांच्या उजव्याऐवजी डाव्या गुडघ्यावर कापून जखम केली आणि नंतर टाके घातले. काही वेळाने शुद्ध आल्यानंतर खेलूकर यांना दोन्ही पाय हलत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी डॉक्टरांना बॅँडेज काढायला लावल्यानंतर उजव्याऐवजी डाव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

    Train Firing: रेल्वे पोलीस मागे लागले, गोळी मारण्याची हुल; चेतन रेल्वे रुळांलगतच्या खारफुटीत शिरला अन्….

    खेलूकर यांचे दोन्ही पाय अधू झाल्याने त्यांना चालणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून डॉ. विपुल काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक उंडे पुढील तपास करीत आहेत.

    उजव्याऐवजी डाव्या पायावर ऑपरेशन करून निष्काळजी केल्याप्रकरणी डॉ. विपुल काळे यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर डॉक्टरांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली जाणार आहे.

    – विजय पगारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *