• Sat. Sep 21st, 2024

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध : शिक्षणमंत्री दीपक केसरकर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 30, 2023
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध : शिक्षणमंत्री दीपक केसरकर – महासंवाद

नाशिक, 30 (जिमाका वृत्तसेवा : प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधांसाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक धोरण ठरविण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक विभाग नाशिक येथे श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. केसरकर बोलत होते. यावेळी विभागीय मंडळ नाशिक विभाग नाशिकचे चेअरमन नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील व नाशिक विभागातील शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षण संस्थांचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांना मोफत गणवेश, पुस्तके, वह्या व इतर सुविधा शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक संस्थांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी टप्पा अनुदान जाहीर करण्यात आले. परंतू या अनुदानातून फक्त 25 ते 30 टक्केच नवीन शाळांना मान्यता देण्यात आल्यामुळे यासाठी काही अटी, शर्ती शिथिल करुन जास्तीत जास्त शैक्षणिक संस्थाना न्याय देण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरु आहे. तसेच विशेष मोहिम राबवून जवळपास 61 हजार शिक्षकांना न्याय देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी करणार

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण आनंदाने घेता यावे यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने दफ्तराचे ओझे कमी करण्यावर भर देण्यात येणार असून एकाच पुस्तकातून सगळे विषय शिकविण्याबाबतचा प्रयोग महाराष्ट्रात राबवायचा असून यामध्ये शिक्षण विभागाने लक्ष घालावे, अशा सूचनाही श्री. केसरकर यांनी दिल्या.

शिक्षक भरतीसाठी रोस्टर अद्ययावत ठेवावे

शालेय प्रश्न सोडवत असतांना टप्पा अनुदानात शाळांना सहभागी करुन घेण्याबरोबर शिक्षकांची मोठी भरती सुरु करण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यात 30 हजार व दुसऱ्या टप्यात 20 हजार शिक्षकांची भरती सुरु केली. ही भरती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदांचे रोस्टर परिपूर्ण करावे. त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शाळांनी व संस्थानी शालेय रेकॉर्ड व रोस्टर अद्यावत ठेवावे, जेणेकरुन पुढील काळात भरती प्रक्रीया जलद गतीने राबविण्यात येईल. तसेच जोपर्यंत नवीन भरती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेवून विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे, असेही श्री केसरकर यांनी सांगितले.

यावेळी श्री. केसरकर यांनी बैठकीस उपस्थित विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed