• Sat. Sep 21st, 2024

गोदामाई खळाळली! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

गोदामाई खळाळली! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे हंगामात पहिल्यादांच शुक्रवारी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी नदीत प्रवाहीत झाल्याने गोदामाई खळाळली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दाणाफाण उडवून दिली आहे. अनेक गावे आणि शहरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पूरस्थितीमुळे रहिवाशांना स्थलांतरीत करावे लागते आहे. एकीकडे राज्याच्या बहुतांश भागात ही परिस्थिती असताना जिल्ह्यात मात्र धुव्वाधार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, मालेगाव तालुक्यातील अनेक भाग अजून कोरडा असला तरी सुदैवाने शहर आणि जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात पावसाने चांगला जोर पकडला आहे. तीन दिवसांपूर्वीच पालखेड धरण समूहामधील दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गेल्या दोन दिवसांत गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणातून देखील विसर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी घेतला. दुपारी एकच्या सुमारास ५३९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढत गेल्यास विसर्गदेखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सोमेश्वर धबधब्याचे आकर्षण

गंगापूर धरणातील पाणी गोदेच्या पात्रात प्रवाहीत करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली आहे. हे पाणी शुक्रवारी रात्री शहरात दाखल होईल. त्यामुळे सोमेश्वर धबधब्यातून पाणी कोसळतानाचा नजारा नाशिककरांना पहावयास मिळणार आहे. शनिवारची मोहरमची सुटी आणि रविवारच्या सार्वजनिक सुटीचा आनंद लुटण्यासाठी सोमेश्वर धबधबा येथे पर्यटकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

…यामुळे धरणातून विसर्ग

गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा जुलैमध्ये ७० टक्क्यांपर्यंत गेल्यास पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचे धोरण आहे. या धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ जुलैला धरणात ७० ते ७५ टक्के पाणीसाठा ठेवला जातो. परंतु, ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आता विसर्ग सुरू केला असला तरी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यास विसर्ग थांबविण्यात येणार असल्याचे

प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, पावसाचा जोर वाढत राहिल्यास विसर्ग आणखी वाढविण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. दारणा धरण आणि नांदुरमध्यमेश्वर बंधारा येथील विसर्ग शुक्रवारी अनुक्रमे ११ हजार ५५२ क्युसेक आणि १६ हजार ३५५ क्युसेक करण्यात आला.

प्रमुख धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारीत)

गंगापूर – ७०
दारणा – ७८
मुकणे – ६०
भावली – १००
नांदुरमध्यमेश्वर – ६०
हरणबारी – ८८
केळझर – ६६
पुनद – ५६

चंद्रपूर शहरात ८ ते १० फूट पाण्याचा वेढा, नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात

धरणांमधून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये

गंगापूर – ५३९
भावली – ७०१
दारणा – ११,५५२
नांदुरमध्यमेश्वर – १६,३५५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed