एसटी बसचे दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता शी. रा. बिराजदार (विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली) यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रवासी वाहनाचे काम विहित वेळेत पूर्ण न करणे तसेच सदर वाहन त्रुटीसह प्रवासी वाहतूकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देणे, त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन होणे या कारणास्तव बिराजदार यांना जबाबदार धरून पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
वाहनाची दुरूस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रुटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतूकीसाठी न वापरण्याच्या सूचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या बसचा बिघाड होणे, छत गळणे यामुळे एसटी महामंडळाच्या बस सेवेवरुन प्रवाशांचा आधीच विश्वास उडालाय. मात्र पर्याय नसल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून एसटीनेच प्रवास करतात. २६ जुलै रोजी गडचिरोली ते चामोर्शी मार्गावर तेच पाहायला मिळाली. चक्क धावत्या एसटी बसचे छप्पर उडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. अहेरी आगारातील एमएच -४० वाय-५४९४ क्रमांकाची ही बस असून सकाळी ६ वाजताच्या सुमारास अहेरी आगारातून सुटली. ही बस अहेरी-मुलचेरा-गडचिरोलीला जाऊन गडचिरोलीवरून अहेरीला परत येताना धावत्या बसचे छप्पर उडाल्याचे दिसून आले.