• Mon. Nov 25th, 2024

    राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ’

    ByMH LIVE NEWS

    Jul 27, 2023
    राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ’

    शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील पर्यटन, वारसास्थळांबाबत कुतूहल निर्माण होवून जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

    युवा पर्यटन मंडळामार्फत भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासह विद्यार्थी आणि तरूणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा अशी विविध कौशल्ये आत्मसात करणे, शाश्वत व जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण होण्यासाठी या मंडळांची मदत होईल. तसेच भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडवून देशातील व राज्यातील पर्यटन, समृद्धी वारसा व संस्कृतींचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशातील व राज्यातील प्रसिद्धी या युवा पर्यटन मंडळांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

     असे असेल मंडळाचे कार्य

    युवा पर्यटन मंडळाच्या सदस्यांनी जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेटी देणे, पर्यटन स्थळांसंबंधी चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयोजन करणे, पर्यटनस्थळे जोपासणे व संवर्धन करणे तसेच पर्यटनस्थळांवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान अशा विविध मोहिमांचे आयोजन करणे हे उपक्रम या युवा पर्यटन मंडळांतर्गत अपेक्षित आहेत.

    पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये ७ वी पासून पुढील विद्यार्थ्यांची “युवा पर्यटन मंडळे” स्थापन करता येतील. युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्यासाठी शाळेत स्थापन केलेल्या एका क्लबसाठी प्रत्येकी १०  हजार तसेच महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी २५ हजार असा निधी ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रोत्साहन स्वरूप अनुदान म्हणून सन २०२३-२४ या वित्तिय वर्षामध्ये पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना वितरित करण्यात येईल.

    या युवा पर्यटन मंडळामध्ये २५ विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रत्येक शाळेतील शिक्षक मंडळाचे समन्वयक म्हणून काम पाहतील. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीसाठी सर्व सहभागी विद्यार्थी सदस्यांचे आधार क्रमांक, शिक्षक व विद्यार्थी समन्वयकांचे आधार क्रमांक, मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. युवा पर्यटन क्लब स्थापनेनंतर पर्यटन स्थळांना भेटी देण्याबाबत छायाचित्रांसह अहवाल मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे. नाशिक विभागातील सर्व संबंधित शाळा, महाविद्यालये यांनी युवा पर्यटन क्लब स्थापन करण्यासाठी उपसंचालक, पर्यटन संचालनायल कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्राम ग्रह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक 422001 दु. क्र. (0253) 2995464/2970049 ईमेल – [email protected] website – www.maharashtratourism.gov.in वर संपर्क साधावा. नाशिक विभागातील शाळा व महाविद्यालयांनी युवा पर्यटन क्लब स्थापन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.

    ०००

    • जिल्हा माहिती कार्यालय,धुळे

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed