• Sat. Sep 21st, 2024
मुंबई-गोवा महामार्गाबद्दल मोठी बातमी; घाटातच दरड कोसळली , कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा

रत्नागिरी: कोकणात मुसळधार पावसाचे थैमान सुरू असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही. मात्र, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे सध्या मोठे जिकरीचे झाले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरती रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्डे पडले आहेत

याबाबत अधिक माहिती अशी की, निवळी येथे दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ही दरड हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, दरड कोसळल्याने हा मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, गुहागर तालुक्यात गुहागर पाचेरी अगार या मुख्यमंत्री सडक योजनेच्या मार्गावर मोठी दरड कोसळल्याने हाही मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

अंधेरीतील चकाला येथे दरड कोसळल्याची दुर्घटना, दारं-खिडक्यांमधून मातीचा ढीग

गुहागर भातगाव मार्गे रत्नागिरीला जोडणारा हा एक पर्यायी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या मार्गावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अशी माहिती गुहागर तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या मार्गावरील दरड हटवण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयाकडे कळवण्यात आले आहे. कोसळलेल्या दरडीमुळे ग्रामीण भागातील असलेला गुहागर तालुक्याचा संपर्क विस्कळीत झाला आहे.

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील चार नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट असून प्रशासनाकडून बुधवारी रात्री उशिरा सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

माझ्या शेतातून जायचं नाही, मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवली, अंत्यसंस्कार दिवसभर रखडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed