काय आहे प्रकरण?
महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांचा म्होरक्या महंमद शहनवाज आलम (वय ३१) फरारी आहे. साकी आणि खान यांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात देण्यात आले आहे. या दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती ‘एटीएस’ने न्यायालयात सादर केली. याअनुषंगाने पोलिस महासंचालक आणि एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांनी पुण्यात बुधवारी आढावा बैठक घेतली. दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी पकडल्याने; तसेच दहशतवाद्यांचे वास्तव्य कोंढवा येथे असल्याचे सिद्ध झाल्याने या पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांसह स्थानिक पोलिसांसोबत या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात स्थानिक पोलिसांनी ‘एटीएस’ला सहकार्य करावे, अशी सूचना दाते यांनी केली.
पुण्यात घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा काही कट होता का, असे पत्रकारांनी विचारले असता दाते यांनी शक्यता नाकारली. या प्रकरणाचा तपास सुरू असून, ‘अल सुफा’ म्हणजे ‘इंडियन मुजाहिदीन’ आहे का, याबाबत माहिती घेतली जात आहे, असे दाते यांनी सांगितले. दहशतवादी दीड वर्षांपासून पुण्यात होते, हे तपास यंत्रणांचे अपयश आहे का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही.
‘इंडियन मुजाहिदीन’ दुसऱ्या नावाने सक्रिय
दोन दहशतवादी प्रशिक्षित असून, त्यांना हल्ल्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. खान आणि साकी पुण्यात कोणत्या चार जणांना भेटले होते; तसेच त्यांना कोणी मदत केली, या दृष्टीने ‘एटीएस’कडून तपास करण्यात येत आहे. जयपूर येथील संभाव्य घातपाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या दोघांचा शोध घेत होती. पुण्यात पूर्वी झालेल्या जर्मन बेकरी, फरासखाना आणि जंगली महाराज रस्ता बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिदीनचा सहभाग होता. ही दहशतवादी संघटना पुन्हा दुसऱ्या नावाने सक्रिय झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोथरूड परिसरात अटक केलेले दहशतवादी प्रशिक्षित असून, या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर आहे. या दोघांना हाताळणाऱ्या सूत्रधारांबाबत महत्त्वपूर्ण माहिती तपासात मिळाली आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत महत्त्वाचे धागेदोरे मिळतील.- सदानंद दाते, पोलिस महासंचालक आणि प्रमुख, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)