• Mon. Nov 25th, 2024

    Ganpati 2023: मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, मंडपासाठी अर्ज कुठे आणि कसा कराल?

    Ganpati 2023: मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, मंडपासाठी अर्ज कुठे आणि कसा कराल?

    मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट, २०२३ पासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे श्री गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही.

    विविध उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित केले जावेत आणि याबाबतची परवानगी प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत व्हावे, या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. याच अंतर्गत गणेशोत्सवासाठी श्री गणेश मंडळांच्या मंडप परवानगीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘एक खिडकी’ योजना येत्या १ ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ – २) श्री. रमाकांत बिरादार यांनी दिली.

    Ganpati Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेकडून महत्त्वाची घोषणा

    श्री गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२३ पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधे अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा >मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर १ ऑगस्टपासून १३ सप्टेंबर २०२३ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

    Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची तयारी सुरू, मूर्ती आणि विसर्जनासंबंधी मोठा निर्णय

    याठिकाणी पोलीस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या परवानगीचेही अर्ज असल्याने यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. सदर मंडपांसाठी मंडळांना परवानगीकरिता शुल्क भरणे आवश्यक नाही. मंडप परवानगी नि:शुल्क देण्यात येणार आहे. तथापि, एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच यावर्षीदेखील श्री गणेश मंडळांना अर्जासोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. श्री गणेश मंडळांना मंडप उभारणी परवानगीबाबत काही अडचण आल्यास आपापल्या विभागातील सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा, असेही उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक श्री. रमाकांत बिरादार यांनी कळविले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed