• Tue. Jan 7th, 2025

    नाशिक, अहमदनगर व पुणे येथील कुटुंब न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात वाढ

    ByMH LIVE NEWS

    Jul 25, 2023
    नाशिक, अहमदनगर व पुणे येथील कुटुंब न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात वाढ

    मुंबई, दि. २५ : नाशिक, अहमदनगर व पुणे येथील महापालिका क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या कुटुंब न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

    उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून कुटुंब न्यायालय अधिनियम १९८४ च्या कलम ३ च्या पोट कलम (१) व (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून राज्य शासनाने काही शहरांच्या कुटुंब न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात वाढ केली आहे. यात नाशिक, अहमदनगर आणि पुणे शहरांच्या कुटुंब न्यायालयांचा समावेश आहे.

    नाशिक येथील कुटुंब न्यायालयाचे अधिकार क्षेत्र देवळाली छावणी क्षेत्राच्या स्थानिक सीमांपर्यंत वाढविण्यात आले आहे. अहमदनगर येथील कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमा अहमदनगर छावणी मंडळाच्या संपूर्ण क्षेत्रापर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत.

    तसेच पुणे महापालिका क्षेत्र व पुणे खडकी छावणी क्षेत्राचा समावेश असलेल्या  क्षेत्राकरिता पुणे येथे कुटुंब न्यायालय स्थापन केले आहे. या कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करून ते देहूरोड छावणी क्षेत्राच्या स्थानिक सीमापर्यंत वाढविण्यात आले आहे, असे शासनाने एका अधिसूचनेद्वारे कळविले आहे.

    0000

    मनीषा सावळे/व.स.सं/

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed