• Sat. Sep 21st, 2024
पिंपरी चिंचवडमधील रस्ता खचला; काम नीट केलं नाही, थेट दोषी बिल्डरांवरच गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न करून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक घनश्याम सुखवानी आणि संजय रामचंदानी यांच्यावर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथील रस्ता खचल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील मे. सुखवानी रामचंदानी एलएलपीतर्फे भागीदार घनश्याम सुखवानी आणि संजय रामचंदानी यांना बांधकाम परवानगी देण्यात आली होती. दोघांच्या भागीदारीत सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी पाया खोदण्यासाठी मोठा खड्डा करण्यात आला होता. त्यामुळे या जागेला लागून असलेला रस्ता खचल्याची घटना गुरुवारी (२० जुलै) सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घातल्याने संबंधित विभागातील उपअभियंता विनायक माने यांनी सांगवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (२१ जुलै) तक्रार अर्ज दिला. त्यानुसार घनश्याम सुखवानी, संजय रामचंदानी आणि संबंधित इंजिनीअरवर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ तपास करीत आहेत.

दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचा संशय, पुणे पोलिसांकडून धडक कारवाई

जमीन परीक्षण अहवालाकडे दुर्लक्ष:
संबंधित इमारतीच्या जमिनीचे व्यावसायिकांनी खासगी संस्थेकडून परीक्षण करून घेतले होते. त्याचा दाखलाही महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. दाखल्यात संबंधित जागेत पहिला थर काळ्या मातीचा असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, खोदकाम सुरू करताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खोदकाम सुरू असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळेच येथील रस्ता वाहून गेला.

बांधकाम विभाग परवानगीपुरताच:

शहरात कोणतेही बांधकाम करताना महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी विविध प्रकारचे दाखले आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. बांधकाम व्यावसायिकाने कागदपत्रांची पूर्तता केली की लगेच बांधकाम परवानगी मिळते. बांधकाम व्यावसायिक दिलेल्या आराखड्याप्रमाणे आणि सुरक्षितपणे काम करत आहे अथवा नाही, याची पाहणी बांधकाम विभागाकडून केली जात नाही.

इमारतीचा आराखडा योग्य असेल, तर बांधकामाला परवानगी देण्याचे काम बांधकाम विभाग करतो. परवानगी देताना विविध अटी आणि नियम घालून दिले जातात. त्यांचे पालन करून बांधकाम करण्याची जबाबदारी व्यावसायिकाची आहे. स्थळांना भेट देणे किंवा शहरातील प्रत्येक बांधकामाची पाहणी करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. त्यामुळे महापालिकेकडून बांधकाम पाहणी केली जात नाही अशी माहिती पिंपरी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

पाच वर्षांनी गुरूजींची बदली, बर्थडेदिवशीच निरोप समारंभ, विद्यार्थी हमसून हमसून रडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed