अहमदनगर जिल्ह्यात अमित ठाकरे यांना दोन ठिकाणी असा नाराजीचा सामना करावा लागला. नगर शहरात ठाकरे यांच्या दौऱ्याधीच कार्यकर्त्यांमधली गटबाजी उफाळून आली होती. त्यानंतर राहाता येथे अशी ठाकरे यांच्यावरच राग व्यक्त करणारी घटना घडली आहे.
अमित ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्राचा संपर्क दौरा केला. त्यासाठी नगर जिल्ह्यातही आले होते. नगर शहरातील एका महाविद्यालयात त्यांनी भेट दिली. तेथील कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर ते शनिशिंगणापूरला गेले. शनिशिंगणापूर दर्शन घेतल्यावर रात्री उशीरा अमित ठाकरे पुढील प्रवासाला निघाले.
नियोजनानुसार ते राहाता येथे थांबणार होते. त्यासाठी चार-पाच दिवस आधीच कार्यकर्ते कामाला लागले होते. ठाकरे यांच्या उपस्थित काही कार्यक्रम करण्यात येणार होते. मंदिरात जाऊन दर्शन, फलकाचे उद्घाटन, कार्यकर्त्यांशी चर्चा असे कार्यक्रम होते. प्रत्यक्षात अमत ठाकरे यांना तेथे पोहोचण्यासाठी खूपच उशीर झाला. त्यामुळे त्यांना कार्यक्रमासाठी थांबण्यास, देवदर्शन घेण्याचेही टाळले. काही सेंकद थांबून कार्यकर्त्यांना नमस्कार करून ते पुढील दौऱ्याला शिर्डीकडे रवाना झाले.
एवढे कष्ट करून आणि प्रतीक्षा करूनही अमित ठाकरे थांबले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी उद्घाटनासाठी तयार केलेल्या फलकावरील जिलेटीन कागद स्वत:च फाडून टाकला. ठाकरे यांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. अशा संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. ठाकरे येणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून आम्ही तयारी करीत आहोत. कार्यक्रमांचे नियोजनही केले होते. मात्र, अमित ठाकरेंनी आमच्यासाठी वेळ दिला नाही. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. याचा आम्ही निषेध करतो. एवढेच नाही तर आम्ही आमच्या पदाचे राजीनामेही देणार आहोत, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.