गो फर्स्ट कंपनीने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उड्डाणे रद्द करीत स्वत:हून दिवाळखोरी न्यायालयाकडे धाव घेतली. त्यानंतर दिवाळीखोरीअंतर्गत ठराव प्रक्रियेत कंपनीच्या डोक्यावर जवळपास २३ हजार कोटी रुपयांची देणी असल्याचे समोर आले. मात्र हे दावे नेमके कशाप्रकारचे आहेत व त्यांचा कशाप्रकारे निपटारा होऊ शकतो, हे अंतिम झालेले नाही. ही स्थिती एकीकडे असली तरीही आता कंपनी मर्यादित स्वरूपात सेवा सुरू करण्यास सज्ज झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगमधील एससी लोवी व न्यूयॉर्क येथील सेरबेरुस कॅपिटल मॅनेजमेंट, या दोन कंपन्या वर्षभरासाठी कंपनीला ४५० कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यास तयार आहेत. त्याआधारे कंपनीने उड्डाणे सुरू करून सेवेचा प्रारंभ करावा व त्यातून महसूल मिळावावा, असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याआधारे सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक कॅप्टनस्तरीय व फर्स्ट ऑफिसर श्रेणीतील वैमानिक, अभियंते, विमानतळावरील कर्मचारीवर्ग कंपनीकडे नसल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) तपासात समोर आले आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी सद्यस्थितीत विमानोड्डाणाला परवानगी देता येणे शक्य नसल्याची डीजीसीएची भूमिका आहे.
सध्या ११५ कॅप्टन व २२५ फर्स्ट ऑफिसर कंपनीच्या वेतन यादीत आहेत, असे गो फर्स्टमधील सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र एका विमानामागे किमान सहा वैमानिक व सहा फर्स्ट ऑफिसर असावेत, असे डीजीसीएने म्हटले आहे. त्यानुसार मर्यादित स्वरूपात २२ विमानांद्वारे सेवा सुरू करायची असल्यास कॅप्टनची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.
नवीन वेळपत्रकाची सूचना नाही
सेवा सुरू करण्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कंपनीकडून अद्याप छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. सेवा सुरू करण्यासाठी नवीन वेळापत्रकाची कुठलीही सूचना आली नसल्याचे विमानतळाच्या उच्चाधिकाऱ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.