चार वर्षांपूर्वी कर्जतमध्ये रस्त्यावर विमनस्क अवस्थेमध्ये भटकत असलेल्या या रुग्णाला ‘श्रद्धा फाऊंडेशन’च्या आरोग्यदूतांनी केंद्रामध्ये आणले. तिथे त्याची काळजी घेण्यासह वैद्यकीय उपचारही सुरू झाले. तो थोडा स्थिरावल्यावर त्याच्याकडे कुटुंबासंदर्भात विचारणा करण्यात आली. मात्र, त्याला नीट सांगता येत नव्हते. भाषेचा अडसर होता. संस्थेतील बंगाली भाषा समजून शकणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही त्याच्या उच्चाराचे आकलन होत नव्हते. गिरीश कुलकर्णी यांच्या स्नेहालय या संस्थेने आयोजित केलेल्या एका सद्भावना रॅलीमध्ये काही आरोग्यदूत बांगलादेश येथे गेले होते. या देशातील काही विद्यार्थ्यांना त्यांनी त्यावेळी भारतात निमंत्रित केले. हे विद्यार्थी जेव्हा भारतात आले, तेव्हा ‘श्रद्धा फाऊंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जोडून दिले. त्यावेळी हा रुग्ण बांग्लादेशमधील असल्याचे लक्षात आले. या विद्यार्थ्यांनी पुन्हा मायदेशी गेल्यानंतर त्याच्या पालकांचा शोध घेतला.
२००२मध्ये स्क्रिझोफ्रेनियाबाधित असलेला हा रुग्ण घर सोडून निघून गेला होता. त्याची पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर, सैन्यदलात अनेक वर्षे सेवा दिलेल्या त्याच्या वडिलांनी आवश्यक सर्व कागदपत्रे भारत तसेच बांगलादेशातील संबधित यंत्रणांना पाठवली. डॉ. स्वराली कोंडविलकर, सामाजिक कार्यकर्ता नितीश शर्मा, रूपा टेकचंदानी, डेनिट म्याथु, समाधान पालकर, धुव्र बडेकर यांनी डॉ. भरत वाटवानी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. अखेर दिवस ठरला. २७ जूनला त्याला भारत बांगलादेश सीमारेषेपर्यंत डॉ. स्वराली आणि नितीश शर्मा घेऊन गेले. मात्र तिथे गेल्यावर देशाबाहेर जाण्याचा परवाना नसल्यामुळे तेथील यंत्रणांनी अडवले. या रुग्णाची करूण कहाणी ऐकून त्यांचे मन हेलावले. मात्र ही प्रक्रिया शिल्लक असल्याने त्याला परत मुंबईत घेऊन येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच्या भेटीसाठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या त्याच्या कुटुंबाची अस्वस्थता पुन्हा वाढली.
रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलिस विभाग, सह प्रादेशिक परदेशी नागरिक नोंदणी अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली आणि देशाबाहेर जाण्याचा परवाना मिळाला. तसेच न्यायालयानेही या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल नसून मानसिक रुग्ण असल्याने त्याला त्याच्या देशात जाण्याचा मार्ग खुला केला. पुन्हा एकदा ‘श्रद्धा’च्या टीमने त्याला भारत-बांग्लादेश सीमारेषेवर नेऊन त्याच्या कुटुंबीयाकडे सुपूर्द केले. आजपर्यंत या संस्थेने दहा हजारांहून अधिक मनोरुग्णांचे पुनर्वसन आणि त्यांना कुटुंबाकडे सुखरूप सोडले आहे.
‘हरवलेल्या, एकाकी फिरणाऱ्या माणसांना आपण समजून घेतले पाहिजे. त्यांच्या वेदनेवर उपाय शोधायला हवा. त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा’, असे डॉ. भारत वाटवानी यांनी ‘मटा’ला सांगितले.