मिळालेल्या माहितीनुसार, रात्री शेताची रखवाली करण्यासाठीही चौघे जण शेतात गेले होते. त्यानंतर दोघे जण म्हणजेच मामा-भाचे शेतात रात्री ट्रॅक्टरमध्ये झोपले असता अचानक नदीला मोठा पूर आला. ट्रॅक्टर पाण्यात तरंगू लागला. हे पाहताच दोघांनी नदीच्या पाण्यात उडी घेतली. दोघांना पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात तब्बल पाच ते सहा किमी वाहून पंचगव्हाणपर्यंत आले. यातील एकाने नदीच्या पुरात असलेल्या झाडाचा आसरा घेतल्याने तो बचावला आहे. तर दोघे जण परत येताना नदीवरील रस्ता ओलांडताना वाहून गेले होते. गावकऱ्यांनी मोठं धाडस करून यापैकी तीन जणांना सुखरूप पुरातून बाहेर काढले आहे. तर एकाचा (मामाचा) शोध अद्यापही सुरू आहे.
पावसाची संततधार सुरू असल्याने प्रशासनाला शोधकामात सुद्धा अडथळे येत आहे. काल रात्री शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अकोट आणि तेल्हारा दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अकोट-तेल्हारा मार्ग बंद झाला आहे. तर काही रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज दिलीपसिंग चव्हाण (१६) हा लहानपणापासून अकोल्यातील पाथर्डी येथील रहिवासी असलेले (मामा) विक्रम शेरसिंग बानाफर (३२) यांच्याकडे शिक्षणाकरीता राहत होता. तो नीलकंठ हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत आहे. तो मामा अंकित संग्रामसिंग बनाफर यांच्यासह शेतात नवांकुरीत पिकाचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्याकरिता २१ जुलै रोजीच्या रात्री गेला होता.
मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत जागल्यानंतर ते ट्रॉलीवर असलेल्या बाजेवर झोपले. शेत विद्रूपा नदी काठावर असल्याने त्यात रात्री सतत पाऊस सुरू होता. नदीला रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक पूर आला. ट्रॉलीमध्ये पाणी शिरल्याने पृथ्वीराजने मामा अंकितला झोपेतून उठविले अन् मामाने त्याला पाण्यात उडी मारण्याचे सांगितले. त्यानंतर स्वतःही पाण्यात उडी घेतली. परंतु पृथ्वीराजची पाण्यात उडी घेण्याची हिम्मत झाली नाही. तेवढ्यात पाण्याच्या वेगाने अचानक ट्रॉली पलटी झाली आणि तो पाण्यात वाहू लागला. पाण्यात वाहत असताना प्रवाहात अचानक त्याला मोठ लाकूड दिसल. त्याने त्या लाकडाचा सहारा घेत काही अंतर कापले.
परंतु, काही अंतर कापल्यानंतर त्याचा हाथ सुटला आणि तो पाण्यात बुडू लागला. परंतु, देव बलवत्तर म्हणून लगेच त्याला दुसरे आणि नंतर तिसरे लाकूड मिळाले. तो जवळजवळ दोन तास पाण्याचा प्रवाहात वाहत वाहत पाच ते सहा किलोमीटर अंतर कापून पंचगव्हाण इथं पोहचला. अन् एका काटेरी झुडपात अडकला. पुराचे पाणी ओसरेपर्यंत तो त्या काटेरी झुडपावर बसला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जुलै सकाळी पाणी ओसरल्यावर तो उतरला. कसाबसा पंचगव्हाण गावात आला. परंतु अजूनही मामा अंकित बेपत्ता असून त्याची शोधशोध सुरू आहे.