• Mon. Jun 15th, 2026

    क्रिकेट पंढरीत तिकिटांचा ‘खेळ’! सोशल मीडियावरुन आर्थिक लुबाडणूक, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री

    क्रिकेट पंढरीत तिकिटांचा ‘खेळ’! सोशल मीडियावरुन आर्थिक लुबाडणूक, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री

    मुंबई : शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला नमवून भारताने टी २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली. एका बाजूला या निकालाचा आनंद असताना दुसरीकडे या सामन्याची तिकिटे न मिळाल्याने अनेक क्रिकेटशौकिनांचा हिरमोड झाला. तिकिटे न मिळाल्याने अधिवेशनातही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

    या सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार झाल्याने तिकिटे सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना मिळू शकली नाहीत. ही तिकिटे काळ्या बाजारात दामदुप्पट विकून हजारो रुपये उकळण्यात आल्याची जोरदार चर्चा असून सोशल मीडियावरूनही तिकिटांच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.

    वांद्रे येथील एक डॉक्टर इन्स्टाग्रामवरील जाहिरातीच्या जाळ्यात अडकला आणि चार तिकिटांसाठी तीन लाख रुपये दिले. पैसे तर गेलेच आणि तिकिटेही मिळाली नाहीत.

    Kandivali Youth Dies : ओमान किनारपट्टीवर ड्रोन हल्ला; मुंबईतील तरुणाचा करुण अंत, तीन महिन्यापूर्वीच आईचं निधन
    वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथे वास्तव्यास असलेले अक्षत त्रिवेदी हे भाभा रुग्णालयात डॉक्टर आहेत. ४ मार्च रोजी इन्स्टाग्रामवर स्क्रोल करीत असताना त्यांना ‘स्काय इव्हेंट इंटरप्रायजेस’ नावाचे एक पेज दिसले. या पेजवर गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्याच्या तिकिटांची जाहिरात होती. ही जाहिरात पाहून अक्षत यांनी आपल्या मित्रांना फोन केला आणि सर्वांनी सामना पाहण्यासाठी जाण्याचे ठरविले. त्यानुसार अक्षत यांनी जाहिरातीमधील मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. समोरील व्यक्तीने एका तिकिटाचा दर तीन हजार रुपये असून तुम्हाला ३,६०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अक्षत यांनी त्वरित चार तिकिटे हवी असल्याचे सांगितले.

    Maharashtra TimesUddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या गावात निसर्गोपचार केंद्राची अर्थसंकल्पात घोषणा; ‘मानसोपचार केंद्र’ म्हणत उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
    चार तिकिटांचे १४,४०० रुपये पाठविण्यासाठी समोरील व्यक्तीने अक्षत यांना क्यू आर कोड पाठवला. डॉक्टरांनी त्यावर १४,४०० इतकी रक्कम पाठवली. पैसे पाठवूनही तिकिटे न आल्याने अक्षत यांनी समोरील व्यक्तीशी संपर्क केला. ही व्यक्ती चालढकल करीत असल्याचे पाहून अक्षत यांनी दिलेली रक्कम परत मागितली. पैसे परत करण्याच्या बहाण्याने समोरील व्यक्तीने आधी यूपीआय आणि नंतर नेट बॅंकिंगचा तपशील अक्षत यांच्याकडून घेतला. त्यांना फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवत अक्षत यांच्या खात्यातून तीन लाख रुपये परस्पर वळविले. ज्यावेळी हा प्रकार लक्षात आला, त्यावेळी अक्षत यांनी विचारणा करताच समोरील व्यक्तीने मोबाइल बंद केला. आर्थिक फसवणूक झाल्याचे कळताच अक्षत यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार केली.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: यंदा दुष्काळाचे सावट! अल् निनोमुळे मान्सूनवर परिणामाची भीती, मुख्यमंत्र्यांनी केले सावध
    २५ हजारांना तिकीटविक्री

    वानखेडे स्टेडियमवरील भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या झहीर बामणे (५०) याला गुन्हे शाखेने अटक केली. दीड ते दोन हजारांची तिकिटे झहीर २५ हजारांना विकत होता. डोंगरी येथील व्यावसायिकाला झहीर वानखेडे स्टेडियमबाहेर भेटला आणि आपल्याकडे तिकिटे असल्याचे सांगितले. दहा तिकिटे देण्यास तो तयार झाला. सर्वसामान्य नागरिकांना तिकिटे मिळत नसताना झहीरकडे इतकी तिकिटे कशी, असा प्रश्न व्यावसायिकाला पडला. तसेच, तो चढ्या दराने विक्री करीत असल्याने या व्यावसायिकाने गुन्हे शाखेला माहिती दिली आणि पोलिसांनी झहीरला पैसे घेताना अटक केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed