• Sat. Sep 21st, 2024

पावसाचा हाहाकार…विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला; पैनगंगावरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला

पावसाचा हाहाकार…विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला; पैनगंगावरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला

नांदेड: जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी किनवट आणि माहूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. दरम्यान पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे.

शुक्रवारी रात्रीपासून किनवट आणि माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. मोमीनपूरा आणि गंगापनगर या भागात पूराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी साचले आहे. जिल्हा प्रशासनाने बचावकार्य राबवत ८० नागरिकांना उर्दू शाळेत स्थलांतरीत केले आहे. शेताचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या पुराच्या पाण्यात एकाच कुटुंबियातील तीन जण अडकल्याची माहिती आहे.

दरम्यान माहूर तालुक्यातही पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. माहूर तालुक्यातील धानोडा पुला पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने माहूर ते यवतमाळ जाणारी वाहतूक बंद झाली आहे. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मागील २४ तासात किनवटमध्ये १५० मिली मीटर आणि माहूर तालुक्यात १८६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. पैनगंगावरील सहस्रकुंड धबधबा देखील ओसंडून वाहत आहे.

पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांना काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न

पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे टाकळी गावातील भरांडे कुटुंबातील तीन जण अडकल्याची माहिती आहे. भरांडे कुटुंबाचे गावातील नदीच्या पलीकडे शेत आहे. शुक्रवारी सायंकाळी रामचंद्र भागवत भरांडे, भागवत रामचंद्र भरांडे, भाग्यश्री रामचंद्र भरांडे हे शेतात गेले होते. मात्र सायंकाळी नदीचा प्रवाह वाढल्याने ते आखाड्यात मुक्काम केले. पण सकाळ पर्यंत पैनगंगा नदीला पूर आला. त्यांच्या शेतात देखील पाण्याचा वेढा पडला. या पाण्यात तिघे जण अडकले. सद्या ते शेतातील घराच्या पत्रावर थांबले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून मदत कार्याला सुरुवात केली, नांदेडहून एसडीआरएफची टीम माहुरकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

काळजी करू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी; पूरग्रस्तांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला धीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed