इर्शाळवाडीत घटनास्थळी पाऊस सुरू असल्याने मदत कार्यात येत असलेल्या अडचणी येत आहेत. माती काढण्यात वेळ जात आहे मात्र ते काम थांबवावं लागेल. मृतदेह बाहेर काढता न आल्याने ते या ठिकाणी कुजतील त्याला दुर्गंधी सुटेल, असं देखील महाजन म्हणाले. इर्शाळवाडीतील दुर्घटनेत मृतांची संख्या वाढू शकते, असं देखील महाजन म्हणाले.
गिरीश महाजन म्हणाले की आतापर्यंत २२ ते २४ जणांचे मृतदेह या ठिकाणी सापडले आहेत. मात्र, एक दोन दिवसात मृतांचा नेमका आकडा समोर येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावणं हा कार्यकर्त्यांचा आतातायीपणा आहे.,असे प्रकार भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही करू नये, असं महाजन म्हणाले. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आगामी २०२४ मधील निवडणुका आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढवू असं आमच्या वरिष्ठांनी आधीचं स्पष्ट केलं आहे,
अमित ठाकरेंनी राज्यातील राजकीय नेत्यांसदर्भात इर्शाळवाडी घटनेनंतर एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य अत्यंत बालिश असल्याची टीका महाजन यांनी केली. हा निसर्गाचा कोप असून त्यामुळं अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, कृपा करून त्यावरून तरी राजकारण करू नका, असंही ते म्हणाले. इर्शाळवाडी धोकादायक गावांच्या यादीत नव्हती. त्यामुळं एवढं मोठं संकट येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, त्या ठिकाणच्या रहिवाशांनी सुद्धा सांगितलं आहे.अतिवृष्टी पाऊस, वादळ यामुळे हा डोंगर कोसळला, असं महाजन म्हणाले.
मी नांदेडचा पालकमंत्री असून विमान उपलब्ध झाल्यास तिकडे पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं महाजन म्हणाले. मंत्री गिरीश महाजन हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.