• Sat. Sep 21st, 2024

सरकारला आपल्या चुका दाखवून देण्याची ताकद ‘प्रेस कौन्सिल’कडे- खासदार कुमार केतकर

सरकारला आपल्या चुका दाखवून देण्याची ताकद ‘प्रेस कौन्सिल’कडे- खासदार कुमार केतकर

म.टा. प्रतिनिधी, पुणे : ‘सोशल मीडिया, कृत्रिम प्रज्ञा, चॅट जीपीटीसारखे तंत्रज्ञान आणि वाढते सरकारी नियंत्रण अशा सर्वच गोष्टींचा पत्रकारितेवर परिणाम होत आहे. मात्र, पत्रकारिता मरणार नाही. जुन्या काळातील पत्रकारांनी केलेल्या संघर्षाच्या धर्तीवर आताच्या पत्रकारांना संघर्ष करावा लागेल. मागील दहा-बारा वर्षे आपण कोणत्या दुःस्वप्नात जगत होतो, याची पत्रकारांना जाणीव होईल आणि येत्या तीन वर्षांत पत्रकारितेला नवे फुटवे फुटतील,’ असे मत ज्येष्ठ संपादक, खासदार कुमार केतकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नुकतीच नियुक्ती झाली. त्यानिमित्त ‘सॅटर्डे क्लब’तर्फे केतकर यांच्या हस्ते करंदीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, माजी आमदार उल्हास पवार, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.

‘प्रेस कौन्सिलच्या हातात फार काही नसल्याचे बोलले जात असले, तरी माध्यमांना, सरकारला आपल्या चुका दाखवून देण्याची ताकद प्रेस कौन्सिलकडे आहे’, असे सांगून केतकर म्हणाले, ‘खासगी कंपन्यांनी जाहिरातींवरील खर्च कमी केला असतानाच सरकार अब्जावधी रुपये खर्चून माध्यमांना जाहिराती पुरवत आहे. त्यामुळे माध्यमांचे सरकारवरील अवलंबित्व वाढले आहे.’

‘पत्रकार, माध्यमे समाजहितासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. पत्रकारिता, माध्यम समूहांवरही बंधने येत आहेत, हा व्यवस्थेचा दोष आहे. ही बंधने दूर झाली, तर अधिक चांगल्या पत्रकारितेला वाव मिळेल’, असे प्रतापराव पवार म्हणाले. ‘प्रेस कौन्सिलसारख्या मोठ्या संस्थेच्या सदस्यपदी निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे. आव्हानात्मक काळात मिळालेल्या या संधीचे करंदीकर चीज करतील’, असे उल्हास पवार म्हणाले. ‘या संधीचा योग्य वापर करून पत्रकारिता आणि समाजासाठी अधिकाधिक योगदान देईन’, असे करंदीकर यांनी सांगितले. ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, माजी आमदार मोहन जोशी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, माध्यमतज्ज्ञ समीरण वाळवेकर, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, उद्योजक युवराज शहा आदींनी करंदीकर यांना शुभेच्छा दिल्या. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. रवी चौधरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed