• Sat. Sep 21st, 2024

सर्पदंशाचे विष उतरवण्यासाठी बाबा चक्क तोंडाने शोषून घेतो विष; अघोरी कृत्य पाहून अंगावर काटा येईल!

सर्पदंशाचे विष उतरवण्यासाठी बाबा चक्क तोंडाने शोषून घेतो विष; अघोरी कृत्य पाहून अंगावर काटा येईल!

नागपूर : साप चावल्यानंतर पूर्वी उपचारातही अनेक अडचणी होत्या. मात्र आता ‘अॅन्टी व्हेनम’ लस उपलब्ध असल्याने सर्पदंश झालेल्या अनेकांचे जीव वाचत आहेत. एकीकडे असे सकारात्मक चित्र असताना रामटेक तालुक्यातील कट्टा गावातील एक बाबा सर्पदंशावर अघोरी उपाय करत असल्याची बाब पुढे आली. साप शरीरावर कुठेही चावला तरी हा बाबा पायावर ब्लेडने वार करून तेथील विष तोंडावाटे शोषून घेण्याचा दावा करतो. या अघोरी उपायांमुळे अनेकांचे जीव जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ‘वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटी’च्या चमूने हा प्रकार उघडकीस आणला.

रामटेक तालुक्यातील काही रुग्णांवर या बाबाने असेच उपचार केल्याची माहिती वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीला प्राप्त झाली. दोन महिलांचा आणि एका युवकाचा मृत्यू या अघोरी उपायांमुळे झाल्याचे पुढे आले. सर्पदंश झाल्यानंतर डॉक्टरांकडे न नेता कुटुंबीयांनी या बाबाकडे जाऊन उपचार घेतले होते. पुन्हा असे प्रकार होऊ नयेत, यासाठी वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीने एक चमू तयार केली. नितेश भांदक्कर, साहिल शरणागत, गौरांग वाईकर, आकाश कशेट्टीवार, मृणाल भरणे, अभय विटीवाले, केशव वानखेडे, लकी खलोडे यांचा यात समावेश होता. यातील २३वर्षीय आकाशच्या हातावर सर्पदंश झाल्याची खोटी खूण करण्यात आली. त्यानंतर ही चमू कट्टा या गावात पोहोचली.

बाबाच्या अंगात येतो नाग…

ही चमू १५ जुलै रोजी त्या गावात पोहोचली. तेथे काही गावकऱ्यांची भेट झाली. ‘साप चावला, इथे कुणी बाबा आहे का’, अशी विचारणा चमूने केली. त्यावर त्या गावातील नागरिकांनी एका मंदिराकडे जाण्यासाठी सांगितले. ही चमू मंदिरात जाऊन त्या बाबाची वाट पाहात होती. २० ते २५ मिनिटांनी बाबा मंदिरात पोहोचले. त्यांच्या काही चेल्यांनी मंत्रोपचार सुरू केले. ते कानावर पडताच बाबांच्या अंगात नाग संचारला. ज्या सापाने या मुलाला दंश केला आहे, तोच साप बाबांच्या अंगात आल्याचे ते सांगत होते. सापासारखे सरपटत बाबांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंत्रोपचार करीत बाबा सरपटतच सर्पदंश झालेल्या मुलाकडे आले. आकाशला काही कळायच्या आतच बाबांनी त्याच्या पायावर ब्लेडने चिरा मारला. तोंडावाटे त्या बाबाने जखमेतून रक्त ओढायला सुरुवात केली. तोंडात जमा होणारे बाबा रक्त बाजूच्या पातेल्यात गोळा करत होते. पूर्ण शरीरात विष पसरले असल्याचे त्या बाबांनी सांगितले. काही वेळ ही उपचारपद्धती चालल्यानंतर बाबांनी आशीर्वाद देत विष उतरल्याचे सांगितले. त्यानंतर प्रसाद म्हणून कढई करण्याचे सांगितले. या चमूने ४०० रुपये बाबांच्या चेल्यांच्या हातात देऊन त्या गावातून काढता पाय घेतला.
गरोदर मातेला जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यातून बाहेर काढले, मात्र, पुढे घडलं धक्कादायक
कठोर कारवाईची मागणी

मुळात साप चावलाच नसताना असे अघोरी उपाय या गावात होऊ लागले आहेत. नागरिकांच्या भीतीचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन असे अघोरी उपाय त्वरित बंद होण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन त्या बाबाचा हा प्रकार बंद करण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed