• Sat. Sep 21st, 2024

तुळजाभवानीचे दागिने अजूनही गायबच; शिवकालीन मौल्यवान वस्तूंचा काळाबाजार? पाहणीत धक्कादायक बाब उघड

तुळजाभवानीचे दागिने अजूनही गायबच; शिवकालीन मौल्यवान वस्तूंचा काळाबाजार? पाहणीत धक्कादायक बाब उघड

म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरातील (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजा-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली ७१ मौल्यवान दुर्मिळ नाणी अद्यापही गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह पाच जणांवर त्रिसदस्यीय समितीने ठपका ठेवला होता. मात्र, समितीने दोषी ठरविलेल्या पाचपैकी चौघांना निर्दोष सोडून एकावरच कारवाई करण्यात आली होती. दागिन्यांचे मोजमाप करताना पुन्हा मंदिरातील दुर्मीळ मौल्यवान दागिन्यांचा काळाबाजार समोर आला आहे.

मंदिरात २००१ ते २००५ या कालावधीत सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने गायब झाल्याचे उघड झाले. तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक राजाभाऊ दीक्षित यांच्या निधनानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता, त्यांच्या घरून चाव्या आणण्यात आल्या आणि देवीचा जमादारखाना तत्कालीन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी तक्रार दिली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी समिती नेमली. समितीने त्यावेळच्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करुन सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी भाविकांनी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळविण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सोने वितळविल्यानंतर मोठ्या तुटीची नोंद करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तेरा वर्षांत २०४ किलो सोने आणि ८६१ किलो चांदी भाविकांनी अर्पण केली. ती वितळविण्यापूर्वी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोने-चांदीचे मोजमाप करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीने मागील दोन महिन्यात मंदिरातील पुरातन दागिने, भाविकांनी अर्पण केलेले दागिने आणि महंतांच्या ताब्यात असलेल्यापुरातन दागिन्यांचे मोजमाप केले. त्यात काही दागिने गायब असल्याचे उघड झाले. मोजमाप करणाऱ्या समितीने अहवाल ओम्बासे यांच्याकडे सादर केला. तो अधिक वस्तुनिष्ठ सादर करावा अशी सूचना करून त्यांनी अंतिम अहवाल स्वीकारला नाही. देवीच्या दागिन्यांच्या सात डब्यांपैकी दोन नंबरच्या डब्यातील मौल्यवान शिवकालीन दागिने गायब असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे. आता हे दागिने नेमके कोणत्या कालावधीत गायब झाले, त्याची जबाबदारी कोणाकडे होती अशा प्रश्नांच्या उत्तरासह समिती पुन्हा अहवाल सादर करणार आहे.
जालन्यातील प्रसिद्ध ‘मत्स्योदरी’ देवी मंदिरात चोरी; चोरट्यांनी लढवली अजबच शक्कल, काय घडलं?
गायब असलेली दुर्मीळ ऐतिहासिक ७१ नाणी

बिकानेर (४), औरंगजेब (१), डॉलर (६), चित्रकूट उदयपूर संस्थान (३), ज्यूलस (१), शहाआलम इझरा (४), बिबाशूरूक (१), फुलदार (१), दारूल खलीफा (१), फत्तेहैदराबाद औरंगजेब अलमगीर (१), दोन आणे (२), इंदौर स्टेट सूर्या छाप (१), अकोट (२), फारोकाबाद (१), लखनौ (१), पोर्तुगीज (९), इस्माईल शहा (१), बडोदा (२), रसुलइल्ला अकबर व शहाजहान (४), ज्यूलस हैदराबाद (५), अनद नाणे (२०).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed