• Sat. Sep 21st, 2024

खासगी लॅब मोकाट; दर आकारणीबाबत निश्चित नियम नसल्याने रुग्णांची लूट सुरुच, निर्णय कधी?

खासगी लॅब मोकाट; दर आकारणीबाबत निश्चित नियम नसल्याने रुग्णांची लूट सुरुच, निर्णय कधी?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कोणत्या आजारासाठी किती चाचण्या करायच्या व त्यासाठी किती दर आकारायचे यासंदर्भात सरकारने निर्देश दिले असले तरीही खासगी लॅबकडून लूट सुरूच आहे. आजारी पडल्यानंतर रुग्णांना तत्काळ निदान हवे असते, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या करायला ते तयार होतात. मात्र त्यासाठी किती शुल्क आकारणी करायची याचे निश्चित नियम पाळण्यात येत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची लूट होत आहे.

या पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा सरकारकडून उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे चाचण्यांच्या दरासंदर्भात नुसते आदेश काढून उपयोग नाही तर या पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा केव्हा उभारण्यात येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. आरोग्य विभागाने डेंग्यूच्या तपासणीसाठी सहाशे रुपये व स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी साडेतीन ते पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली असतानाही राज्यातील खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून मनमानी पद्धतीने रुग्णांकडून पैसे घेण्यात येतात. तत्काळ रक्त तपासून त्याचा वैद्यकीय अहवाल उपलब्ध व्हावा यासाठी अतिरिक्त पैसे आकारणे, घरी रक्त तपासून देण्याच्या सुविधेसाठी दुप्पट आकारणी करणे अशा विविध पद्धतीने खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होते. हा प्रकार रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ सप्टेंबर २०१६ रोजी डेंग्यूच्या तपासण्यांसाठी प्रत्येकी ६०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क न आकारण्याचे निर्देश खासगी पॅथॉलॉजी लॅबना दिले आहेत. परंतु खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून हे निर्देश पाळले जात नाहीत.
टाटा हॉस्पिटल कर्मचाऱ्यांवरच कॅन्सरग्रस्तांच्या लुटीचा आरोप; ११ कर्मचाऱ्यांना अटक, डॉक्टरही सामील?
चाचण्या योग्य प्रकारे होतात का?

राज्य सरकारकडून चाचण्या करण्यासंदर्भात निर्देश देण्यात येत असले तरी या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच चाचण्या योग्यप्रकारे होत आहेत की नाही हे तपासणारी कोणतीही यंत्रणा सरकारने उभारली नाही. त्यामुळे चाचणी योग्य प्रकारे होत आहे की नाही हे समजण्यासाठी कोणताही मार्ग नाही. रुग्णाच्या चाचण्या योग्य प्रकारे होण्यासाठी सरकारने पॅथॉलॉजी लॅबची नोंदणी करणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रयोगशाळेचा व्यवसाय अनियंत्रित आहे. पालिकेकडे अधिकृत प्रयोगशाळांची कोणतीही नोंदणी नसल्याने अधिकृत आणि अनधिकृत प्रयोगशाळांची माहिती उपलब्ध होत नाही. हा व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी लॅबची नोंदणी होणे आवश्यक आहे. ही नोंदणी होत नाही तोपर्यंत लॅबकडून करण्यात येणाऱ्या चाचण्या आणि त्यांच्या दरावर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे मत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचे कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सामान्यांच्या आकलनापलीकडचे

रूग्णालयाबाहेर डायग्नोस्टिक सेंटरची गर्दी असण्याबद्दल आक्षेपार्ह काहीच नाही, परंतु ज्याप्रकारे काम मिळवले जाते आणि त्यासाठी कोणत्या क्लृप्ती वापरल्या जातात हे सर्वसामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ असतानाही या वैद्यकीय सेवांची उपलब्धता सर्वसामान्यांना मिळणे गरजेचे आहे याकडे आरोग्य कार्यकर्ते आर. व्ही. पाटील यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed