दोन महिन्यांनंतरही मणिपूर राज्य धुमसतं आहे. दोन समाजात सुरू असलेल्या वादामुळे संपूर्ण राज्य पेटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्तक्षेपानंतरही मणिपूर शांत करण्यास केंद्र सरकारला यश मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं.
ते म्हणाले, मणिपूरमधल्या महिलेच्या नग्न धिंड प्रकरणावरुन संसद सुरु असताना पंतप्रधान मोदी संसदेबाहेर त्यावर प्रतिक्रिया देतात. याचा अर्थ ते संसदेला मानत नाहीत. नवी संसद कशासाठी उभी केली? अदानींवर चर्चा करत नाही, मणिपूरवर चर्चा करत नाही, भ्रष्टाचारावर चर्चा करत नाही, मग ती संसद हवी कशाला? मग तुम्ही पंतप्रधान कसले आहात? संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात.. मणिपूर हा देशाचाच भाग आहे. मणिपूरची जनता या देशातलीच आहे. मणिपूरच्या एका महिलेला रस्त्यावर आणून तिला नग्न करुन मारलं जातंय. ही देशातल्या १४० कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणताय ना.. आधी मणिपूरमधली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळा, अशा शब्दात राऊतांनी मोदींना लक्ष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा राजकीय स्वार्थ असतो. स्वार्थाशिवाय पंतप्रधान आणि भाजप काहीही करत नाही. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ सांगेन. पण संसदेचं अधिवेशन सुरु असताना मणिपूर प्रकरणावर मोदी संसदेत न बोलता संसदेच्या बाहेर बोलतात. संसदेत अदानींवर चर्चा करत नाही, मणिपूरवर चर्चा करत नाही, भ्रष्टाचारावर चर्चा करत नाही, मग ते नवं संसद भवन हवंय कशासाठी? असा उद्विग्न सवाल राऊतांनी विचारला.