आठवडयाच्या सुरवातीपासूनच जिल्हयात पावसाने दमदार हजेरी लावली. दररोज तालुक्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस पडत आहे. जुन महिन्यात दगा दिलेला पाऊस जुलै महिन्यात सक्रिय झाला आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी बिलोली, देगलूर, नायगाव, धर्माबाद, उमरी या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. धर्माबाद तालुक्यातील बनाळी गावाचा पाणी वाढल्याने संपर्क तुटला आहे. याठिकाणच्या जवळपास २०० नागरीकांचे तालुकाप्रशासनाच्या वतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत होते.
बिलोली तालुक्यातील सहा मंडळातही १७ जुलै च्या मध्यरात्रीपासून पाऊसाला सुरुवात झाली. सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारीही पाऊस पडत असल्यामुळे परिसरातील लहान मोठे नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरुन ओसंडून वाहत आहे. गंजगाव , माचनुर ,कोडग्याळ, सावळी , आरळी, गावांचा बिलोलीशी संपर्क तुटला आहे. तसेच या मार्गावरील वाहतुक पूर्णत: ठप्प झाली आहे.
काही ठिकाणी नाले फूटुन शेतीमध्ये पाणी गेल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. बिलोली शहरालगत सावळी गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने एका इंग्रजी शाळेतील शेकडो विद्यार्थी आणि त्यांचे पालक अडकले होते.
स्थानिक नागरिकांनी एकमेकांच्या मदतीने तसेच जेसीबी मशीनच्या सहाय्याने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. तसेच बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रामतीर्थ येथे नदी आणि नाले तुडुंब भरून वाहत असल्याने शेताकडे कामासाठी गेलेले शेतकरी, जनावर नदीच्या पलिकेडे अडकली होती. त्यांना सुरक्षित ठिकाणी आण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.
धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी गावाला पूर आला होता. मुखेड, मुदखेड, भोकर या तालुक्यात रिमझिम तर, नांदेड, अर्धापूर, माहूर, किनवट, हिमायतनगर, लोहा, कंधार, हदगावमध्ये दिवभर ढगाळ वातावरण होते. रात्री पावसाची शक्यता निर्माण झाली होती.